३ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:53+5:30
शासनाने यंदा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढणे ऐच्छिक केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक विमा काढण्याकरिता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांनी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असलेल्या जिल्ह्यातील बरेच शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्यासाठी जात आहे.

३ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नैसर्गिक संकटापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पिकांचा विमा उतरवितात. मात्र विमा कंपनीने पीक विमा काढण्यासाठी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. त्यामुळे ऑनलाईन सातबारा नसलेले जिल्ह्यातील तीन हजारावर शेतकऱ्यांवर पीक विमा काढण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने यावर हात झटकल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
शासनाने यंदा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढणे ऐच्छिक केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक विमा काढण्याकरिता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांनी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असलेल्या जिल्ह्यातील बरेच शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्यासाठी जात आहे. पण ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन आहे केवळ त्याच शेतकऱ्यांचा पीक विमा काढला जात आहे.पण ज्या शेतकऱ्यांकडे ऑनलाईन सातबारा नाही त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे.
गोंदिया तालुक्यातील दासगाव, कंटगी, जब्बारटोला परिसरातील शेतकरी पीक विमा काढण्यासाठी ऑनलाईन सातबारा काढण्याकरिता ग्राहक सेवा केंद्रावर जात आहे. पण तिथे गेल्यावर संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे सातबारा अद्याप महसूल विभागाने अपलोड केले नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
जवळपास गोंदिया तालुक्यातील तीन हजारावर शेतकऱ्यांचे सातबारा अद्याप ऑनलाईन करण्यात आले नसल्याची माहिती आहे. याला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा दुजोरा दिला आहे. विमा कंपन्या ऑनलाईन सातबारा असल्याशिवाय विमा काढण्यास नकार देत आहे. त्यातच ३१ जुलै ही पीक विमा काढण्याची अंतीम तारीख आहे.
त्यामुळे शेतकºयांची अडचण वाढली असून बँका, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर हात झटकल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
ऑफलाईन सातबारा पीक विमा काढण्यास अडचण काय
विमा कंपन्या आणि बँका पीक विमा काढण्यासाठी ऑनलाईन सातबाऱ्याची अट पुढे करुन पीक विमा काढण्यास नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता ऑफलाईन सातबारावर पीक विमा काढण्यास नेमकी अडचण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मी ग्राहक सेवा केंद्रात ऑनलाईन सातबारा काढण्यासाठी गेलो मात्र सातबारा ऑनलाईन नसल्याचे सांगितले. तर विमा कंपनीकडे ऑफलाईन सातबारा घेवून गेलो असता त्यांनी या सातबारावर पीक विमा काढता येत नसल्याचे सांगून परत पाठविले. त्यामुळे आता पीक विमा काढण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
- बाबुलाल बिसेन, शेतकरी कंटगी.
....................................
ऑफलाईन सातबाराधारक शेतकऱ्यांचा पीक विमा निघत नसल्याच्या तक्रारी गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहे. ही बाब कृषी आयुक्तालयाला कळविण्यात आली. यावर ३१ जुलैपूर्वी तोडगा न निघाल्यास हे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतील. यासंदर्भात शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
- प्रमोद पाटील, विभागीय नियंत्रक, रिलायन्स विमा कंपनी.