६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षाचा सश्रम कारावास

By नरेश रहिले | Published: August 18, 2023 06:44 PM2023-08-18T18:44:20+5:302023-08-18T18:44:25+5:30

प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल : १० हजार द्रव्यदंडाचीही शिक्षा 

30 years of rigorous imprisonment for the murderer who abused a 6-year-old child | ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षाचा सश्रम कारावास

६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षाचा सश्रम कारावास

googlenewsNext

गोंदिया: आपल्या काकाचे घरी पाळण्यावर एकटी झुलत असलेल्या ६ वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देत तिच्यावर लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ३० वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड ठोठावला. ही सुनावणी १८ ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६ वर्षाच्या मुलीवर आरोपी महेश टेंभुर्णे (३२) रा. ता. अर्जुनी/मोरगाव, जि. गोंदिया याने अत्याचार केला होता. आरोपी हा त्याच गावातील रहिवासी असून ओळखीचा फायदा घेत त्याने ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. २७ ऑक्टोबर २०२१ ला ती चिमुकली आपल्या घरा शेजारी काकाचे घरी पाळण्यावर एकटी झुलत होती. आरोपीने तिला एकटी पाहून चॉकलेटचे आमिष देत घरामागे असलेल्या संडासच्या खड्ड्याकडे नेले.

चिमुकलीला चॉकलेटकरिता १० रूपयाची नोट देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर चिमुकली ही घरी रडत-रडत आली. तिच्या आईने तिला रडण्याचे कारण विचारता तिने घडलेली मािहती दिली. पिडितेच्या आईने पोलीस स्टेशन केशोरी येथे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोपीविरूद्ध तकार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप इंगळे यांनी केला होता. एकंदरित आरोपीचे वकील व अतिरिक्त सरकारी वकील कैलाश खंडेलवाल यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द सरकार पक्षातर्फे सादर साक्षदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, इतर कागदोपत्री पुरावे ग्राहय धरून आरोपी महेश टेंभुर्णे (३२) ता. अर्जुनी/मोरगाव, जि. गोंदिया याला शिक्षा सुनावली.
 

१० जणांची न्यायालयासमोर साक्ष नोंदविली
या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिद्ध करण्यासाठी सरकार, पिडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कैलाश खंडेलवाल यांनी एकुण १० साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्याकरिता युक्तीवाद केला.

अशी सुनावली शिक्षा
आरोपी महेश टेंभुर्णे (३२) ता. अर्जुनी/मोरगाव, जि. गोंदिया, याला भारतीय दंड विधानाचे कलम ३७६ (अ) (ब) अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार दंड ठोठावला. दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास असा एकुण ३० वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम ही पिडितेला देण्याचे आदेश केले.

पालकांनी घ्यावी पाल्यांची काळजी

या प्रकरणात पिडितेचे वय हे अवधे ६ वर्ष असून आरोपीचे वय ३२ वर्षे होते. आरोपी हा त्याच गावातील रहिवासी असल्याने ओळखीचा फायदा घेऊन त्याने अल्पवयीन चिमुकलीला घरामागे नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सद्यस्थितीतील समाजाची एकुणच स्थिती पाहता, लहान मुले हे असहाय्य असतात. अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांच्या डावपेचांना ते सहज बळी पडतात.

समाजातील अशा काही विकृत मानसिकतेमुळे लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारावरील घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे समाजाची मानसिकता ओळखने तसेच पालकांनी आपल्या पाल्यांबददल योग्य ती काळजी घेवून दक्ष राहावे.- ॲड. कैलाश खंडेलवाल, सहायक सरकारी वकील, सत्र न्यायालय, गोंदिया.

Web Title: 30 years of rigorous imprisonment for the murderer who abused a 6-year-old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.