शेतकऱ्यांंना मिळणार २३.३५ कोटींचे सानुग्रह अनुदान
By Admin | Updated: June 4, 2015 00:51 IST2015-06-04T00:51:32+5:302015-06-04T00:51:32+5:30
जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१४-१५ मध्ये ३० मे २०१५ पर्यंत एकूण ९ लाख ३४ हजार १८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांंना मिळणार २३.३५ कोटींचे सानुग्रह अनुदान
गोंदिया : जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१४-१५ मध्ये ३० मे २०१५ पर्यंत एकूण ९ लाख ३४ हजार १८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदीवर शेतकऱ्यांना २३ कोटी ३५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींमार्फत जिल्ह्यात विविध धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना ४७ आणि आदिवासी विकास महामंडळाला ४० अशी एकूण ८७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली होती.
आदिवासी विकास महामंडळांतर्गत असलेल्या धान खरेदी केंद्रांमध्ये देवरी तालुक्यातील अंभोरा, चिचगड, चिचेवाडा, सावली, पुराडा, डवकी, सालेकसा तालुक्यातील सालेकसा, बिजेपार, मक्काटोला, सातगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव, केशोरी, इळदा, बाराभाटी, पवनी (धाबे.), पांढरवानी, सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी, चिखली, खजरी, डोंगरगाव, सडक अर्जुनी आदि आदिवासी सेवा सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, रावणवाडी, धापेवाडा, दासगाव, टेमणी, आसोली, कोचेवाही, कामठा, मजीपूर, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कालीमाटी, तेढा, कुऱ्हाडी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव येथील तीन धान खरेदी केंद्र, नवेगावबांध, महागाव, वडेगाव (स्टेशन), धाबेटेकडी, भिवखिडकी, आमगाव तालुक्यातील आमगाव व गोरठा, सालेकसा तालुक्यातील कोटजंभोरा, तिरोडा तालुक्यातील बघोली, भिवापूर, तिरोडा, ठाणेगाव, मेंढा, मुंडीकोटा, चिखली, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, बाम्हणी, मुरपार, पांढरी हे केंद्र सुरू असून तिरोडा तालुक्यातील वडेगाव, येडमाकोट, नवेझरी व विहिरगाव येथील धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक नसल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
अनुदान मिळण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे हे अनुदान संबंधित खरेदी केंद्रामार्फत चेकद्वारे मिळणार आहे. मात्र त्यासाठी अजून किमान १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. खरेदी संस्था त्या अनुदानाच्या रकमेची हुंडी काढून ती गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पाठवेल. त्यांच्याकडून तो प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आणि त्यांच्याकडून शासनाला जाईल. शासनाकडून तो प्रस्ताव मंजूर होऊन पुन्हा उलट्या क्रमाने परत येऊन खरेदी संस्थेकडे ते पैसे जमा होतील. त्यानंतर ती संस्था शेतकऱ्यांचे धनादेश तयार करून त्यांना वाटप करतील.
गतवर्षीपेक्षा खरेदीत वाढ
आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत मार्च २०१५ पूर्वी ८ लाख ४८ हजार ८८४ क्विंटल तर १ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५ पर्यंत ८४ हजार ५९८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धान खरेदी बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. गेल्यावर्षी सुरूवातीला छत्तीसगड व मध्यप्रदेशात मिळणाऱ्या बोनसमुळे तिकडे धान गेला होता. यावर्षी तसे झाले नसल्याने धानाचे उत्पादन वाढल्याचा आभास होत आहे.
‘अ’ प्रतीच्या धानाला १४०० रु. प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण धानाला १३६० रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहे. आता त्यात २५० रु. प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदानाची भर पडली आहे.