२२ चिमुकल्यांना केले पालकांच्या स्वाधीन
By Admin | Updated: July 20, 2015 01:17 IST2015-07-20T01:17:54+5:302015-07-20T01:17:54+5:30
आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी या पंधरवड्यात आणखी २२ चिमुकल्यांना हुकडून काढले असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश मिळविले आहे.

२२ चिमुकल्यांना केले पालकांच्या स्वाधीन
आॅपरेशन मुस्कान : अद्याप ३५ बालकांचा शोध सुरूच
गोंदिया : आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी या पंधरवड्यात आणखी २२ चिमुकल्यांना हुकडून काढले असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश मिळविले आहे. १ ते १५ जुलै दरम्यानच्या कालावधीत करण्यात आलेली ही कारवाई असून अद्याप बेपत्ता असलेल्या ३५ चिमुकल्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
लहान मुला-मुलींचे अपहरण करून त्यांच्याकडून भीक मागविणे तसेच वाममार्गाला लावण्याचे प्रकार काहींकडून केले जातात. तर मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखाली मुला-मुलींच्या बेपत्ता व अपहरणाच्या या संख्येला लक्षात घेत राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम सुरू केली आहे. १ ते ३० जुलै या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार असून यासाठी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी यासाठी लावले आहेत.
हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांमधील काही मुले पालकांकडे परत आली असल्यास त्यांची खात्री करून त्याबाबतची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात नेमलेले विशेष पथक हे दररोज अशा मुलांचा शोध घेऊन नियंत्रण कक्षात माहिती देत आहे.
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क अभियान जोमात सुरू आहे. या कामात पोलीस विभाग स्वयंसेवी संस्थाची मदत घेत आहे. तर हरविलेली किंवा घरातून निघून गेलेली मुले-मुली सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करताना छायाचित्र काढून प्रसारीत केली जाणार आहेत.
हरविलेल्या तसेच अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्यांबाबत मिळालेल्या आकडेवारीनुसार सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले तर ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यात मागील पंधरवड्यात पोलिसांनी २२ चिमुकले शोधून काढले आहेत. अशाप्रकारे २३८ मुले व ४८२ मुली पोलिसांना मिळाल्या असून अद्याप १० मुले व २५ मुली बेपत्ता आहेत.
पोलीसांनी आॅपरेशन मुस्कानला यशस्वी करण्याचा चंग बांधल्यामुळे या पंधरवाड्यात बेपत्ता मुलामुलींचा शोध घेण्यात त्यांना यश लाभले आहे. पोलिसांनी ठरविले तर कारवाईचे कोणतेही काम अशक्य नाही. परंतु पोलिस काही ठिकाणी दिरंगाई करीत असल्यामुळे अनेक प्रकरणे उघडकीस येत नसल्याचे प्रकार ही बघावयास मिळतात. (तालुका प्रतिनिधी)