गंगाबाईत ‘आयुष’साठी मिळाला २० लाखांचा निधी
By Admin | Updated: December 27, 2014 22:52 IST2014-12-27T22:52:59+5:302014-12-27T22:52:59+5:30
येथील बाई गंगाबाई रूग्णालयात कार्यरत आयुष या भारतीय उपचार पद्धतीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यासाठी येत असलेली अडचण दूर झाली आहे. डावी-कडवी विचारसरणीतून आयुषसाठी स्वतंत्र

गंगाबाईत ‘आयुष’साठी मिळाला २० लाखांचा निधी
गोंदिया : येथील बाई गंगाबाई रूग्णालयात कार्यरत आयुष या भारतीय उपचार पद्धतीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यासाठी येत असलेली अडचण दूर झाली आहे. डावी-कडवी विचारसरणीतून आयुषसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम करण्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या महिनाभरात या कक्षाचे बांधकाम सुरू होणार असून त्यानंतर स्वतंत्र कक्षातून आयुष रूग्णांना आपली सेवा देणार आहे.
अॅलोपॅथी उपचार पद्धतीसह नागरिकांकडून आता भारतीय चिकीत्सा पद्धतीचा अवलंब केला जात आहे. भारतीय चिकीत्सा पद्धती म्हटल्यास त्यात आयुर्वेदीक, युनानी, योग, सिद्ध व होम्योपॅथी सह पंचकर्मचा यात समावेश होतो. लोकांचा वाढता कल बघता शासनाने मागणीनुसार त्यांना शासकीय रूग्णालयातही या चिकीत्सा पद्धती उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने आयुष केंद्र शासकीय रूग्णालयांत सुरू केले. येतील बाई गंगाबाई रूग्णालयात मागील दोन वर्षांपासून आयुष कार्यरत आहे.
मात्र रूग्णालयात आयुषसाठी स्वतंत्र असे कक्ष नसल्याने आहे त्या स्थितीशी जुळवून घेत आयुषचा कारभार सुरू आहे. यामुळे आयुषकडून अपेक्षीत असे परिणाम रूग्णालयाला मिळाले नाही. यावर आयुषसाठी स्वतंत्र असे कक्ष उपलब्ध करवून देण्यासाठी रूग्णालय प्रशासनाची धडपड सुरू होती. यावर तोडगा म्हणून रूग्णालय प्रशासनाने रूग्णालयातील पडीत असलेल्या पाकगृहाच्या जागेवर कक्ष बांधकामाचे ठरवून त्याला लागणाऱ्या निधीसाठी धडपड सुरू केली. अखेर रूग्णालय प्रशासनाच्या सततच्या पाठपुराव्याला फलीत लाभले व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आयुषच्या नवीन कक्षासाठी डावी-कडवी विचारसरणीतून २० लाखांचा निधी शासनाने उपलब्ध करवून दिला आहे.
विशेष म्हणजे आयुषच्या कक्षासाठी सुमारे साडे चार हजार स्क्वेयर फूट जागेची गरज आहे. मात्र रूग्णालयात तेवढी जागा उपलब्ध नसल्याने जुने पाकगृह असलेल्या दोन हजार स्क्वेयर फूट जागेवर कक्ष तयार केले जाणार आहे. तर जागेची कमतरता भासू नये यासाठी दोन माळ््यांचे हे प्रशस्त असे बांधकाम केले जाणार असून दोन्ही माळ््यांवरून आयुषचा कारभार चालेल. या जागेची बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. आता बांधकाम विभागाकडून तांत्रीक परवानगीची वाट बघितली जात आहे. तर बांधकामासाठी लागणाऱ्या प्रशासकीय मंजूरीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही कामे उरकताच महिनाभरात कक्षाचे बांधकाम सुरू होणार असल्याचे अंदाज वर्तविला जात आहे. तर या कक्षाचे बांधकाम होताच आयुष आपल्या स्वतंत्र कक्षातून रूग्णांना आवडेल त्या भारतीय चिकीत्सा पद्धतीने उपचाराची सोय उपलब्ध करवून देणार आहे. (शहर प्रतिनिधी)