१६ शेतकऱ्यांना मिळाले सौर कृषी पंप
By Admin | Updated: December 26, 2016 00:51 IST2016-12-26T00:51:26+5:302016-12-26T00:51:26+5:30
उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी

१६ शेतकऱ्यांना मिळाले सौर कृषी पंप
१० पंपांचे काम आहे सुरू : ३० अर्जांचे वर्क आॅर्डर दिले
कपिल केकत ल्ल गोंदिया
उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या ‘सौर कृ षीपंप योजने’चा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या १६ शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात आले असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे. तर वीज वितरण कंपनीने आणखी ३० अर्जदार शेतकऱ्यांचे वर्क आॅर्डर काढले असून १० जणांचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. नियमीत विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर, पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औष्णिक पद्धतीच्या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. करिता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी आता सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले व त्यातूनच ‘सौर कृषीपंप योजना’ पुढे आली. या योजनेला २४ फेब्रुवारी २०१५ रोजी मंजूरी देण्यात आली आहे.
या योजनेतंर्गत जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यात आॅगस्टपासून ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला १९५ कनेक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. एकंदर कृषीपंपांना सौर उर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी ताटकळत रहावे लागणार नाही.
शिवाय वीज बीलाची थकबाकी असल्यास होणारी पंचाईत व वीज चोरीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शिवाय वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारापासून शेतकरी मुक्त होऊन आपल्या शेतीला कधीही पाणी पुरवठा करू शकणार हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
त्यानुसार जिल्ह्यात ७७ जणांना डिमांड नोट देण्यात आली आहे. यातील ३९ जणांनी पैसे भरले असून १६ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३० जणांचे विभागाने वर्क आॅर्डर काढले असून सध्या १० जणांचे काम सुरू आहे. म्हणजेच जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांकडील पंप सध्या सौर उर्जेवर चालत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिवाय लवकरात लवकर उर्वरीत अर्जदारांना त्यांचे कनेक्शन देण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
योजनेतील अटीही
केल्या शिथील
४सुरूवातीला या योजनेंतर्गत पाच एकरपेक्षा कमी शेती असलेले शेतकरीच लाभ घेऊ शकत होते. मात्र शासनाने यामध्ये शिथिलता आणली असून आता १० एकर शेती असलेले शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. शिवाय ज्याने सौर कृषी पंप घेतला त्याला लाईन टाकून जोडणी दिली जाणार नव्हती. ्मात्र आता ती अट काढण्यात आली आहे. शिवाय १० वर्षे पंप चालविल्यानंतर शेतकऱ्यांना वीज वाहिनी टाकून वीज पुरवठाही दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून ३, ५ व ७.६ एचपीचे (अश्वशक्ती) पंप पुरविण्यात येत असून त्यासाठी आधारभूत किंमत निश्चीत करण्यात आली आहे.
प्रोत्साहनासाठी प्रात्यक्षिक व कॅम्प
४सौर कृषी पंप योजनेबाबत जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी व अर्जदार वाढावे यासाठी वीज वितरण कंपनीकडून प्रात्यक्षीक व कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात सालेकसा, केशोरी व चिचगड या दुर्गम भागात कॅम्प लावले जात आहेत. येथील लोकांना (शेतकऱ्यांना) या योजनेबाबत माहिती दिली जात असून सोबतच ज्यांच्याकडे सौर कृषी पंप लागले आहेत त्या शेतकऱ्यांक डे नेऊन सौर कृषी पंपाचे प्रात्यक्षीक दाखविले जात आहे. जास्तीतजास्त लोकांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी हे प्रयत्न विभागाकडून केले जात आहे.