जिल्ह्याला मिळणार मानव विकासच्या अतिरिक्त १६ बसेस
By Admin | Updated: June 25, 2014 23:49 IST2014-06-25T23:49:43+5:302014-06-25T23:49:43+5:30
शासनाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटीच्या स्कूल बसेस सुरू केल्या. गतवर्षी तालुकानिहाय प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी पाच बसेसची व्यवस्था करण्यात

जिल्ह्याला मिळणार मानव विकासच्या अतिरिक्त १६ बसेस
एसटी महामंडळ : स्कूल बस आजपासून सुरू, १ जुलैपासून होणार नियमित फेऱ्या
देवानंद शहारे - गोंदिया
शासनाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटीच्या स्कूल बसेस सुरू केल्या. गतवर्षी तालुकानिहाय प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातच शासनाने आता प्रत्येक तालुक्याला पुन्हा अधिकच्या दोन बसेस देण्याचे प्रस्तावीत केले आहे. त्यानुसार आता गोंदिया जिल्ह्याला आठ तालुक्यांसाठी १६ बसेस मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यासाठी आता पाच अधिक दोन अशाच सात स्कूल बस राहणार आहेत.
एसटी महामंडळाच्या गोंदिया आगारात एकूण चार तालुक्यांचा समावेश होतो. यात गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या तालुक्यांचा समावेश आहे. या चार तालुक्यांसाठी गोंदिया आगाराला मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण आठ स्कूल बसेस मिळणार आहेत. पूर्वीच्या २० व आताच्या आठ मिळून मानव विकासच्या एकूण २८ बसेस आता गोंदिया आगारात असतील. तिरोडा तालुक्यासाठी तिरोडा आगारात पूर्वीच्या पाच व आताच्या दोन मिळून सात स्कूल बस असतील. याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सडक/अर्जुनी व मोरगाव/अर्जुनी या तालुक्यांसाठी साकोली आगाराला यंदा सहा स्कूल बसेस मिळणार आहेत. त्यामुळे पूर्वी १५ व आताच्या ६ अशा एकूण २१ स्कूल बसेस आता सदर तिन्ही तालुक्यात धावणार आहेत.
यंदा मिळणाऱ्या या नवीन स्कूल बसेस चालविण्यासाठी जि.प. गोंदियाकडून रस्त्यांचे निरीक्षण करण्यात आले आहे. या निरीक्षणात काही रस्त्यांवर विद्युत तारांची समस्या आहे. काही रस्ते या बसच्या रहदारीसाठी अयोग्य आहेत. तर काही रस्त्यांवर बांधण्यात आलेले पूल लहान आहेत. मात्र मानव विकास कार्यक्रमाच्या बसेस मोठ्या असल्याने या मार्गावरून त्यांना चालविणे कठीण जाणार असल्याचे निरीक्षणात आढळले. काही गावच्या सरपंचांनी लहान बसेस चालविण्याची मागणी केली आहे. मात्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या बसेस आकाराने मोठ्या आहेत. याच बसेस त्या मार्गाने चालवाव्या लागणार असल्याने समस्या उद्भवणार आहे.
तिरोडा तालुक्यात धावणाऱ्या स्कूल बसेस : १) तिरोडा-गोरेगाव बस चिखली, इंदोरा, मंगेझरी मार्गे धावेल. तिरोड्यातून सुटण्याची वेळ सकाळी ८.४५ व दुपारी ३ वाजता, गोरेगाववरून परतीची वेळ सकाळी १० व सायंकाळी ४.१५ वाजता. २) तिरोडा-घोगरा बस मांडवी, मुंडीपार, चांदोरी, घाटकुरोडा मार्गे धावेल.
तिरोड्यातून सुटण्याची वेळ सकाळी ६ व दुपारी १ वाजता. घोगऱ्यावरून परती वेळ सकाळी ६.४० व दुपारी १.४० वाजता. ३) तिरोडा-गोंदिया बस धापेवाडा मार्गे, सुटण्याची वेळ सकाळी ९.१५ व गोंदियातून परतीची वेळ सकाळी ११ वाजता. ४) तिरोडा-गोंदिया बस दवनीवाडा मार्गे, तिरोड्यातून सुटण्याची वेळ सकाळी ९.३० व दुपारी ३ वाजता, गोंदियावरून निघण्याची वेळ सकाळी ११.३० व सायंकाळी ४.३० वाजता. ५) तिरोडा-अर्जुनी बस सुटण्याची वेळ सकाळी ६.४० व परतीची वेळ सकाळी ७.१५ वाजता. ६) तिरोडा-वडेगाव बस सुटण्याची वेळ सायंकाळी ५.१५ व परतीची वेळ ५.४५ वाजता राहील.