१५ टक्के नागरिक निरक्षर
By Admin | Updated: August 8, 2015 01:54 IST2015-08-08T01:54:40+5:302015-08-08T01:54:40+5:30
निरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले.

१५ टक्के नागरिक निरक्षर
दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद : जिल्ह्यात ७५ हजार प्रौढ निरक्षर
नरेश रहिले गोंदिया
निरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षे थातूरमातूर पध्दतीने चाललेल्या या अभियानाचा जिल्ह्यातील लोकांना कोणताच फायदा झाला नाही. जिल्ह्यात आजही ७५ हजार लोक निरक्षर असल्याची कबुली निरंतर शिक्षण विभाग देत आहे. निरक्षरांची ही संख्या १५ टक्के आहे.
१५ वर्षावरील व्यक्तींना साक्षर करून त्यांना चौथी, आठवी व त्यावरील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे, आक्षर झालेल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व घेतलेले शिक्षण कायम राहील याचे नियोजन करण्यासाठी केंद्र शासनाने साक्षर भारत अभियान अंमलात आणले. सन २०१० मध्ये जि.प. शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी निरक्षरांचा आकडा एक लाख पाच हजाराच्या घरात होता. त्यांनतर डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ पर्यंत या तीन महिन्यात निरक्षरांना साक्षर करण्यात आले. त्यावेळी २५ हजार जणांना नवसाक्षर करण्याचे उद्दीष्ट असताना २३ हजार जणांना नवसाक्षर करण्यात आले. मार्च २०१३ ला या अभियानासाठी निधी आला नाही. परिणामी हे अभियान बंद राहीले. शासनाने आता पुन्हा नव्याने प्रत्येक निरक्षरामागे अनुदान देण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन सर्वेक्षण करण्याचे ठरविले. निरंतर शिक्षण विभागाने सर्वेक्षणासाठी प्रेरक नियुक्त करून महिनाभरात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
महिला निरक्षरांचे प्रमाण ६५ टक्के
निरंतर शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गोंदिया जिल्ह्यात ७५ हजार लोक निरक्षर आढळले. यात महिलांचे प्रमाण ६५ टक्के आहे. तर पुरूषांचे प्रमाण ३५ टक्के आहे. सन २०११ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तकासाठी १३ लाख ६४ हजार रूपये देण्यात आले होते. त्यातून पुस्तक खरेदी करण्यात आले. त्यानंतर टेबल, खुर्ची व कपाटासाठी निधी देण्यात आला होता. मार्च २०१३ मध्ये हा कार्यक्रम बंद असल्यामुळे निरक्षरांना साक्षर करता आले नाही. फक्त तीनच महिने शिकविल्यामुळे निरक्षरांची संख्या जास्त आहे.
११०० प्रेरकांना सोडले वाऱ्यावर
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रत्येक गावात दोन प्रेरक तयार करण्यात आले. त्यांना २ हजार रूपये मानधनावर नेमण्यात आले होते. सुरूवातीचे तीन महिने काम केल्यानंतर त्यांना बंद करण्यात आले. पैश्याअभावी त्यांना बंद करण्यात आले. जिल्ह्यातील ११०० प्रेरक वस्तीशाळा शिक्षकांप्रमाणे आशा ठेवून बसले होते. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे ते निराशेत आहेत.
उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार
गोंदिया जिल्हा निर्मितीला १६ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी निरंतर शिक्षण विभागाचे कार्यालय नाही. हे काम भंडारावरून चालते. या संदर्भात केव्हाही संपर्क केल्यावर टाळाटाळीचे उत्तरे दिले जाते. अनेक वेळा फोनच उचलला जात नाही. या कार्यालयात उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.