लोकवर्गणीतून १४३ शाळा डिजीटल
By Admin | Updated: July 17, 2016 00:14 IST2016-07-17T00:14:48+5:302016-07-17T00:14:48+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न केले जात आहेत.

लोकवर्गणीतून १४३ शाळा डिजीटल
१२९ शाळांत वाचन कट्टा : जिल्हा परिषदेच्या २० शाळांत एज्युकेशन अॅपचा वापर
नरेश रहिले गोंदिया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या शाळा शासनाच्या अनुदानातून नाही तर लोकसहभागातून डिजीटल करण्यास शासनाने सांगितले. आता गावातील शिक्षक आपल्या शाळेला डिजीटल करण्यासाठी नागरिकांकडून वर्गणी घेत आहेत. गेल्या १० महिन्यात जिल्हा परिषदेच्या १४३ शाळा डिजीटल झाल्या आहेत.
विज्ञान युगात विद्यार्थ्यांना पाठीवरचे ओझे कमी हवे, तसेच त्यांना एका ‘क्लिक’वर सर्व अभ्यासक्रमांची माहिती मिळावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न सरकारने पाहिले. त्यासाठी ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा बनविणे, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सीब्लीटी), पीएसआर ( पब्लिक सोशल रिसपॉन्सीब्लीटी) अशा विविध उपक्रमातून जि.प.च्या शाळा व त्यातील विद्यार्थ्यांना हायटेक बनविण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. त्यामुळे या उपक्रमाला जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली.
तिरोडा तालुक्याला ‘अदानी’चा हातभार
आजघडीला गोंदिया जिल्ह्यात १४३ डिजीटल शाळा झाल्या आहेत. त्यात अदानी समूहाच्या मदतीमुळे तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक शाळा म्हणजेच ३५ शाळा डिजीटल झाल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ७, सालेकसा तालुक्यात ८, गोरेगाव तालुक्यात २७ शाळा, गोंदिया तालुक्यात १८ शाळा, देवरी तालुका ७ शाळा, आमगाव तालुक्यात २८ शाळा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १३ अश्या १४३ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २० शाळांमध्ये शिक्षणासंदर्भात व्हिडीओ दाखविण्याचेही काम केले जात आहे.
स्क्रिनवर अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करून शाळेत मल्टीमिडीया प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारीत एज्युुकेशनल सॉफ्टवेअर त्या शाळेत उपलब्ध केले जाते. विद्यार्थ्यांना स्क्रीनवर अभ्यासक्रम आनंददायी पध्दतीने शिकविला जातो. एक शाळा डिजीटल करण्यासाठी जिल्ह्यात दोन ते तीन लाख रूपये खर्च आला आहे. देवरी तालुक्याच्या जेठभावडा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात तर टॅबलेट आले आहेत.
कमी वर्गणीतून मोबाईल डिजीटल शाळा
कमी वर्गणी होत असलेल्या शाळांना डिजीटल करण्यासाठी मोबाईलचा आधार घेतला जात आहे. जिल्ह्यात मोबाईल डिजीटल शाळा ३६५ आहेत. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुका ३६, आमगाव ५२, देवरी २६, गोंदिया ६९, गोरेगाव ६५, सालेकसा ५८, सडक-अर्जुनी १४, तिरोडा ४५ अशा ३६५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत.
वाचन कट्यात गोरेगाव पुढे
विद्यार्थ्यांना आनंददायी पध्दतीने वाचन करता यावे यासाठी शालेय परिसरातच वाचन कट्टा तयार करण्यात आला. या वाचन कट्ट्यात सुरूवातीला आमगाव तालुका पुढे होता. मात्र आता गोरगाव तालुका पुढे झाला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २, आमगाव ३७, देवरी १५, गोंदिया ५, गोरेगाव ४७, सालेकसा १३, सडक-अर्जुनी ३, तिरोडा ७ अश्या १२९ शाळांत वाचन कट्टा तयार करण्यात आला आहे.