सरकारी नोकरी लावून देतो म्हणत १४.५० लाखांनी लुटले
By नरेश रहिले | Updated: June 20, 2024 18:56 IST2024-06-20T18:55:51+5:302024-06-20T18:56:50+5:30
तक्रारीनंतर गुन्हा दाखल : कुडवा येथील व्यक्तीची फसवणूक

सरकारी नोकरी लावून देतो म्हणत १४.५० लाखांनी लुटले
नरेश रहिले, गोंदिया : महसूल व वनविभागात नोकरी लावून देण्याच्या नावावर १४ लाख ५० हजाराने फसवणूक करणाऱ्या एकावर रामनगर पोलिसांनी १९ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा नाका, रिंग रोड, गोंदिया येथील नितीनकुमार मोहन पराते (४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीला महसूल विभागात किंवा वनविभागात नोकरी लावून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये घेतले. संजय पोतनलाल शिरसागर (रा. खापर्डे कॉलनी, परमात्मा, एकनगर, गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे. संजयने बनावट नियुक्तीपत्रही पराते कुटुंबीयांना दिले. ते रूजू होण्यासाठी गेले असताना हे बनावट नियुक्तीपत्र असल्याचे लक्षात आले.
नितीनकुमार पराते यांच्या पत्नीला नोकरी लावून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून २० मे २०२२ ते २५ जुलै २०२२ यादरम्यान १४ लाख ५० हजार रुपये घेतले आहेत. या घटनेसंदर्भात १९ जून रोजी रामनगर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ४६५, ४६८, ४७१, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे तपास करीत आहेत.