१३९ शाळांना भेटी देऊन होणार तपासणी
By Admin | Updated: June 25, 2014 00:32 IST2014-06-25T00:32:35+5:302014-06-25T00:32:35+5:30
तिरोडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एस.जी. मांढरे यांनी तिरोडा पं.स. अंतर्गत येणाऱ्या सर्व १३९ शाळांना भेटींचे नियोजन केलेले आहे. पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमात २६ जून ते १० जुलैपर्यंत

१३९ शाळांना भेटी देऊन होणार तपासणी
काचेवानी : तिरोडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एस.जी. मांढरे यांनी तिरोडा पं.स. अंतर्गत येणाऱ्या सर्व १३९ शाळांना भेटींचे नियोजन केलेले आहे. पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमात २६ जून ते १० जुलैपर्यंत शाळांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यात येणार आहे.
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत एकूण १३९ शाळा आहेत. यात प्राथमिक ३९, उच्च प्राथमिक ६४ आणि माध्यमिक ६ शाळांचा समावेश आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या एक दिवसापूर्वी २५ जूनला वर्ग व शालेय परिसर स्वच्छ करुन शाळेच्या पहिल्या दिवसाकरिता शाळा सुसज्ज कराव्या, पालकभेटी घेण्यात याव्या, शिक्षणाची पालखी काढण्यात यावी, असे निर्देश सर्व मुख्याध्यापकांना गट शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी दिले आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचा समावेश करण्यात यावा, असेही निर्देश मांढरे यांनी मुख्याध्यापकांना दिले आहे. पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रम २६ जून ते १० जुलैदरम्यान राबविण्यात येणार असून १३९ शाळांना सर्व अधिकारी व कर्मचारी शाळेला भेटी देऊन तपासणी करणार आहेत. शाळाभेटी नियोजनानुसार गशिअ एस.जी. मांढरे संपूर्ण तालुक्यातील कोणत्याही शाळा, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरीत, डी.बी. साकुरे आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ए.सी. शहारे हे बीट अंतर्गत येणाऱ्या शाळा, सर्व केंद्रप्रमुखांना केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळा आणि विषयतज्ज्ञ ब्रजेश मिश्रा यांना विहिरगांव, सोनेगाव, बालापूर, मलेझरी, चिखली, मेंदिपूरसह आठ शाळा, प्रा.ग. ठाकरे यांना मंगेझरी, कोडेवर्रा, खमारी, इंदोरा, भिवापूरसह नऊ शाळा आणि देवीदास हरडे यांना नवेझरी, नांदलपार, कोयलारी, मारेगाव आणि चोरखमारासह आठ शाळा तसेच अन्य विषयतज्ज्ञांना सात-आठ शाळा तपासायच्या आहेत. शाळा तपासणी कार्यात शाळांकडे देण्यात आलेले आणि राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती घेणे, पोषण आहार, पाठ्यपुस्तका वितरित झाल्या की नाही, शालेय पोषण आहारात गोड पदार्थ, वयोगट ६-१४ दाखल पात्र संख्या किती आणि प्रत्यक्षात दाखल झाले किती अशा विविध मुद्यांची तपासणी संबंधित भेटी देणारे अधिकारी करणार असल्याची माहिती गट समूह साधन केंद्राच्या सूत्रांनी दिली आहे. (वार्ताहर)