१३ गावांचा पाणी पुरवठा बंद

By Admin | Updated: February 11, 2015 01:30 IST2015-02-11T01:30:01+5:302015-02-11T01:30:01+5:30

जिल्हा परिषद प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत तालुक्यातील १३ गावे महिना भरापासून तहानलेली आहे. जिल्हा परिषदेचा निष्काळजीपणा, नियोजन शून्यता,...

13 villages closed | १३ गावांचा पाणी पुरवठा बंद

१३ गावांचा पाणी पुरवठा बंद

संतोष बुकावन अर्जुनी-मोरगाव
जिल्हा परिषद प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत तालुक्यातील १३ गावे महिना भरापासून तहानलेली आहे. जिल्हा परिषदेचा निष्काळजीपणा, नियोजन शून्यता, स्थानिक मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अभियंत्याचा कामचुकारपणा ही योजना बंद होण्याचे मुख्य कारण आहे. २० गावांना पाणी पुरवठा करणारी ही योजना विद्युत विभागाचे १० लक्ष ५२ हजार रुपयांचे वीज बील थकीत असल्याने बंद असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील २० गावांना या योजनेमुळे पाणी मिळणार होते. पैकी १५ गावांना पाण्याचे नियोजन झाले. यामध्ये गोठणगाव, बोंडगाव, सुरबन, गंधारी, करांडली, रामनगर, प्रतापगड, अर्जुनी, मोरगाव, निलज, माहुरकुडा, मालकनपूर, ताडगाव, झरपडा, बुधेवाडा या गावांचा समावेश केला. वर्षाआधी करांडली व प्रतापगडचा पाणीपुरवठा दोन महिन्यांची वसूली थकीत असल्याने बंद केला गेला हे विशेष. उर्वरीत १३ गावे मागील एक महिन्यापासून नळात पाणी येण्याची वाट बघत आहेत. विचारणा केल्यास अधिकारी १०.५२ लक्षाचे वीज बील थकीत असल्याचे कारण पुढे करतात. पाणी वाटप संस्थेव्दारा वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या पदरी अद्यापही निराशाच आहे. मागील मौसमात पाऊस कमी पडल्याने जानेवारी पासूनच विहिरी व हातपंपांची पातळी कमी होऊन उन्हाळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचे सावट उभे राहण्याचे चित्र दिसत आहेत. गोठणगाव कालवा सुरू असला की विहिरींची पातळी वाढते मात्र ते बंद असले की पाण्याचे संकट निर्माण होते हे नेहमीचे वास्तव आहे.
माजी आमदार दयाराम कापगतेंच्या काळातील ही योजना २० वर्ष लोटूनही दुष्टचक्रात सापडली आहे. गेली १६-१७ वर्ष ही योजना कुचकामी ठरली होती. कशीबशी चालू झाली मात्र येथील नळात पाणी कम हवाच जास्त असते. लोकसभा निवडणुकांपूर्वी नळयोजना सुरू करा अथवा मतदानावर बहिष्कार ठाकू, असा इशारा देताच ही योजना सुरू झाली होती. मागील वर्षी आमदार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंनी जिल्हा परिषद समोर उपोषण करून ताला ठोको आंदोलन केले आणि लगेच ही योजना सुरू करण्यात आली. या वारंवार होणाऱ्या त्रासाने कंटाळून पाणी वाटप संस्थेच्या मंडळाकडून बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा विरोधी पक्षात असतांना ना. बडोलेंनी उपोषण केले होते. आता ते सत्तेवर असूनही पुन्हा तिच दुष्काळी स्थिती आहे. स्वत:ला भूमीपुत्र म्हणवून घेणारे नाना पटोले सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. या क्षेत्राला बारामतीचे स्वप्न दाखविणारे बलाढ्य राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यासारखे त्रिमूर्ती असूनही जर ही छोटीशी योजना बंद पडत असेल तर या क्षेत्रातील जनतेचे यापेक्षा मोठे दुर्भाग्य कुठले.
जि.प. कडे देखभाल दुरूस्ती या हेडखाली पाच कोटी रुपये असतांना पैकी दोन कोटी खर्च झाले उर्वरीत धूळखात आहेत. स्थानिक संबंधीत अभियंत्याना त्याचे नियोजन करूनही समस्या सोडवू शकतात. इच्छाशक्तीच्या अभावाने हे कर्मचारी पंगू पणाची भूमिका बजावताना दिसतात.
पाच दिवसांत योजना पूर्ववत होईल
वरीष्ठांकडे प्रस्ताव पाठवून थकीत बिलासंदर्भाने ५० टक्के अनुदान तीन फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहे. उर्वरीत रक्कम संस्थांना भरणे आहे. ही कामे लवकरच पूर्ण करून नळयोजना पाच दिवसांत पूर्ववत होणार.
- शिवशंकर शर्मा ,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.
मंत्र्यांना सांगूनही फायदा नाही
ही योजना कुठल्या ना कुठल्या अडचणीने बंद पडत असते. वारंवार संबंधीतांना पाठपुरावा करूनही ते लक्ष देत नाही. खा. नाना पटोले व ना. राजकुमार बडोलेंना यासंदर्भात माहिती देऊन ही काहीच फायदा नाही. शेवटी हे मंडळ बरखास्तीचा निर्णय आम्ही घेतला आहे.
- पतिराम राणे
अध्यक्ष, अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळ, गोठणगाव

Web Title: 13 villages closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.