मजीप्रा वरिष्ठांकडे मागणार १.१२ कोटी
By Admin | Updated: February 16, 2015 00:01 IST2015-02-16T00:01:04+5:302015-02-16T00:01:04+5:30
शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरातील रस्त्यांचे खोदकाम केले आहे.

मजीप्रा वरिष्ठांकडे मागणार १.१२ कोटी
गोंदिया : शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरातील रस्त्यांचे खोदकाम केले आहे. हे काम पूर्ण झाले नसतानाच शहरातील जुन्या दोन योजनांसाठीही रस्त्यांचे खोदकाम केले जाणार आहे. मात्र खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी योजनेत तरतूद करण्यात आलेला निधी कमी पडत असल्याने मजीप्रा वरिष्ठांकडे १.१२ कोटी रूपयांची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून लवकरच तो वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे.
शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेता शहराला २४ तास पाणी पुरवठा करणारी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरात सुर्याटोला, सिव्हील लाईन्स व भिमनगर परिसरात तीन पाणी टंकीचे बांधकाम करण्यात आले आहे. तर या टाक्यांना ठरवून देण्यात आलेल्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी तेवढ्या परिसरात पाईप लाईन टाकण्यात आली आहे. अशाप्रकारे तिनही योजनांसाठी अवघ्या शहरातील रस्ते खोदण्यात आले असून त्यांची दुरूस्तीही मजीप्रालाच करावयाची आहे.
६१.३८ कोटींच्या या योजनेचे काम सुरू असून संपण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. ही योजना तशी सन २०१३ पर्यंत पूर्ण करावयाची होती मात्र योजनेचे काम रेंगाळत चालल्याने सन २००७-०८ मध्ये तयार करण्यात आलेली ही योजना आता ठरविण्यात आलेल्या निधी पेक्षा जास्त किंमतीची होत आहे. त्यातही भिमनगरातील योजनेसाठी १३ किमी. व सिव्हील लाईन्स परिसरातील योजनेसाठी तीन किमी. रस्त्यांचे खोदकाम करावयाचे आहेच. याशिवाय रेलटोलीतील जुन्या योजनेसाठी पाच किमी. तर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील जुन्या योजनेसाठी तीन किमी. रस्ते खोदावयाचे आहेत. अशाप्रकारे एकूण २२ किमी. रस्त्यांचे खोदकाम मजीप्रा करणार आहे.
अशात या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी येणारा खर्च योजनेतील तरतूदीपेक्षा जास्त होत आहे. अशात वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांची दुरूस्ती मजीप्राला अशक्य होत आहे. तर पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुर्गत झाली असून यामुळे शहरवासीयांत मजीप्राप्रती चांगलाच रोष खदखदत आहे.
अशात खोदण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मजिप्राला सुमारे १.१२ कोटी रूपयांचा अतिरीक्त निधी लागणार असल्याचा मजिप्राचा अंदाज आहे. त्यानुसार मजिप्रा आपल्या वरिष्ठांकडे १.१२ कोटींची मागणी करणार आहे. तर यासाठी मजिप्राने एक प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो वरिष्ठांना दिला जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)