१०६२ शाळा पूर्ण वेळ सुरू करण्यास सहमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:00:59+5:30
कोरोनाचा उद्रेक काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नसतानाच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये हा विचार करून शासनाकडून शाळा सुरू करण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यातच २६ जून रोजीच शाळेचा ठोका वाजवायचा की नाही याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते.

१०६२ शाळा पूर्ण वेळ सुरू करण्यास सहमत
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शाळी कधी सुरू करायच्या विषयाला घेऊन अद्यापही संभ्रमावस्था असतानाच शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समित्यांना घेण्याचा अधिकार शिक्षण विभागाने दिला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील १०६२ प्राथमिक शाळा २६ जूनपासून सुरू करण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांनी होकार दिला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक २५८ शाळा व्यवस्थापन समित्यांनी ‘हिरवी झेंडी’ दिली आहे.
कोरोनाचा उद्रेक काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नसतानाच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये हा विचार करून शासनाकडून शाळा सुरू करण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यातच २६ जून रोजीच शाळेचा ठोका वाजवायचा की नाही याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील १६५४ शाळांच्या व्यवस्थापन समित्यांना सभा घेऊन तसा निर्णय घेण्यास सांगीतले होते. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्वच शाळा व्यवस्थापन समित्यांनी या विषयावर निर्णय घेतला व शिक्षण विभागाला पाठविला. त्यानुसार, जिल्ह्यातील १०६२ शाळा पूर्णवेळ सुरू करण्यास समित्यांनी होकार देत ‘हिरवी झेंडी’ दिली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक २५८ शाळांचा समावेश असून सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात कमी ५२ शाळांनी सहमती दर्शविल्याचे दिसत आहे. याशिवाय, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १२९, आमगाव तालुक्यातील १०३, देवरी तालुक्यातील १६७, गोरेगाव तालुक्यातील १००, सालेकसा तालुक्यातील १२७ तर तिरोडा तालुक्यातील १२६ शाळांचा समावेश आहे.
नियमित अर्ध वेळेसाठी ३८२ शाळा
नियमित पूर्णवेळ शाळा सुरू करण्यासाठी सर्वाधिक १०६२ शाळा व्यवस्थापन समित्यांनी होकार दर्शविला असतानाच त्यानंतर ३८२ समित्यांनी नियमित अर्ध वेळ शाळा सुरू करण्यासाठी सहमती दर्शविली.यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६७, आमगाव ४४, देवरी २१, गोंदिया १३६, सालेकसा १७, सडक-अर्जुनी ४६ तर तिरोडा तालुक्यातील ५१ शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव तालुक्यात १५७ समित्यांपैकी नियमित पूर्णवेळ शाळा सुरू करण्यासाठी १०० तसेच काही विद्यार्थी ऑनलाईन-काही विद्यार्थी शाळेत राहून शाळा सुरू करण्यास उर्वरीत ५७ समित्यांनी सहमती दर्शविली. येथे तालुक्यातील समित्यांनी नियमित अर्ध वेळ व एक दिवस आड शाळा सुरू करण्याचा पर्याय नापसंत केल्याचे दिसत आहे. याशिवाय ७९ समित्यांनी एक दिवस आड तर १३१ समित्यांनी काही विद्यार्थी ऑनलाईन-काही विद्यार्थी शाळेत राहण्याचा पर्याय निवडला आहे.