येथे १० रुपयांत विकत मिळतो आजार

By Admin | Updated: July 14, 2014 01:09 IST2014-07-14T01:09:40+5:302014-07-14T01:09:40+5:30

बातमीचे शीर्षक वाचून आपण देखील काही क्षण अवाक व्हाल,

At 10 rupees, the disease is bought | येथे १० रुपयांत विकत मिळतो आजार

येथे १० रुपयांत विकत मिळतो आजार

कारवाई शून्य : हॉटेल, उपाहारगृहातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष
गोंदिया :
बातमीचे शीर्षक वाचून आपण देखील काही क्षण अवाक व्हाल, मात्र ही वास्तविकता आहे. आजच्या पिढीला फास्टफुड संस्कृतीचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र या थोड्याशा आकर्षणामुळे आपण रस्त्यावरील ५ ते १० रुपयाला मिळणारे उघडे पदार्थ खाऊन आजाराला आमंत्रण देत आहोत. ही बाब नागरिक विसरत असतात आणि यामुळेच आपण आजाराला बळी पडतो.
पावसाळ्याच्या दिवसांत कावीळ, अतिसार, कॅलरा व पोटाच्या आजारांची लागण होते. यालाही काही प्रमाणात अस्वच्छता व उघड्यावरील पदार्थांचे सेवन कारणीभूत आहे. नागरिकदेखील आपल्या धावपळीत व हौस भागवायची म्हणून या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांचे सर्रासपणे सर्व काही विसरुन सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करताना आरोग्याच्या दृष्टिकोनातून व स्वच्छतेबाबत नियमांचे पालन केले जाते आहे की नाही, रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानातून केवळ १० रुपयांत घेतलेला नाश्ता आजाराला आमत्रंण देऊ शकतो या बाबींकडे नागरिक दुर्लक्ष करीत असतात आणि यातूनच आपण या विविध आजारांना बळी पडतात.
शहरात सुमारे पाचशेच्यावर हॉटेल्स व उपाहारगृह आहेत. यात अधिकांश विनपरवाना असल्याचेही दिसते. औषध प्रशासन विभागाने हॉटेल व उपाहारगृहांना परवाने देतांना काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन हॉटेल व उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येतो. तर नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या हॉटेल, उपाहारगृह, चहाटपरी यांनी आपल्या परिसरात स्वच्छता ठेवण्याकरिता काही नियम लागू केले आहे.
नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम २७४, २७५ नुसार खानावळ, उपाहारगृह, हॉटेल चालविणाऱ्या संचालकाकडून केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यास व या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्यांच्यावर या कलमान्वये कारवाई करण्याची तरतूद आहे. इंडियन पिनल कोडच्या कलम ७२ व ७३ नुसार खराब मिठाई व मानवी शरिरास अपायकारक असणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. हे नियम जरी असले तरी नियमांची अमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील भाजीबाजार असो की मुख्य रस्त्यांच्या बाजूला काही लोकांनी आपले छोटेसे उपाहारगृह थाटले असोे. उपाहारगृह चालकांना परवाना घेताना ज्या नियम व अटींचे पालन करण्यास सांगण्यात आले होते त्या नियमांचेदेखील पालन करणे आवश्यक आहे. मात्र शहरातील बहुतेक ठिकाणी दिसणाऱ्या चित्रावरुन या नियमांचे पालनच केले जात नसल्याचे दिसून येते.
आपण स्वच्छता व उघड्यावर पदार्थ ठेवून त्यांची विक्री केल्यामुळे हे आपल्या ग्राहकांच्या जीवावर बेतेल या बाबीकडेही ते दुर्लक्ष करतात. मागील वर्षभरात अस्वच्छता अन्न व औषध प्रशासन विभागाने तयार करुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाही उपहारगृह व हॉटेल मालकावर कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही. याचा अर्थ सर्व उपाहारगृह व हॉटेलांत नियमांचे पालन केले जात आहे असे नाही. तर संबंधीत विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने त्यांचे हात ही बांधल्या गेले आहेत. भंडारा येथील अधिकाऱ्यांना येथील प्रभार असल्याने त्यांना दोन्हीकडे बघावे लागते. त्यामुळे त्यांना ही कारवाई करण्याकरिता वेळ नाही.
(शहर प्रतिनिधी)
हॉटेल व उपाहारगृहाकरिता हे आहेत नियम
हॉटेल व उपाहारगृहात ग्राहकांना दिले जाणारे पाणी तपासणी केलेले असावे. उपाहारगृहात काम करणाऱ्या मजुरांचे आरोग्य उत्तम असावे. यासाठी त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी. उपाहारगृहात तयार केलेले पदार्थ नेहमी झाकून ठेवलेले असावे, स्वच्छता असावी, हॉटेलात जाळ लागले नसावे. तसेच ग्राहकांच्या आरोग्यास अपायकारक असलेल्या पदार्थांची विक्री करु नये. या पदार्थांमध्ये कुठल्याही अपायकारक वस्तुंची भेसळ करु नये. उपाहारगृह व हॉटेलमधील खिडक्यांना बारीक जाळी लावलेली असावी. हे नियम असून या सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
नियमांचे उल्लघंन केल्यास परवाना रद्द
अन्न व औषध विभागाने हॉटेल व उपाहारगृहाचा परवाना घेणाऱ्या मालकांना सदर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हॉटेल किंवा उपाहारगृह संचालकाकडून या नियमांचे उल्लघंन करण्यात आल्यास त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्याच्या कलम ३२ नुसार कारवाई करता येते तसेच तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास त्यांना नोटीस देवून १४ दिवसांचे आत नोटीसचे उत्तर मागितले जाते. उत्तर न दिल्यास सदर उपाहारगृह चालकाचा परवाना रद्द करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.

Web Title: At 10 rupees, the disease is bought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.