देशसेवेत तरुणांनी योगदान द्यावे : दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:57 IST2025-09-23T11:57:02+5:302025-09-23T11:57:46+5:30
डिचोली येथे 'नशामुक्त भारत नमो रन'मध्ये ३३०० युवकांचा सहभाग : काँग्रेस खोटे आरोप करत समाजात विष पसरवतेय : भाजपची टीका

देशसेवेत तरुणांनी योगदान द्यावे : दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भारत वैभवाच्या शिखरावर पोहोचला असताना काँग्रेस कल्याणकारी व देशहिताच्या प्रयत्नांना खो घालत आहे. खोटे आरोप करून विष पेरत आहेत. शेजारील राष्ट्रांनाही देशाची प्रगती बघवत नाही, अशा स्थितीत तरुणांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन नशामुक्त भारत निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
डिचोली येथे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे वाळशी येथे नशामुक्त भारत अभियानांतर्गत नमो रनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यावेळी यास वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेत तब्बल ३३०० युवक-युवती, नागरिकांनी सहभाग घेतला.
व्यासपीठावर खासदार सदानंद तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा भाजपध्यक्ष दयानंद कार्बोटकर, युवा अध्यक्ष तुषार केळकर, भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळ्ळकर, समीर मांद्रेकर, दीपक नाईक, सर्वांनंद भगत, राष्ट्रीय युवा नेत्या अर्पिता, अनिकेत चणेकर आदी उपस्थित होते. पहाटे साडेपाच वाजता दामू नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. किरण नाईक यांनी सूत्रसंचालन केले. तुषार केळकर यांनी आभार व्यक्त केले.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या नमो रनमध्ये सहभाग घेताना पाच किलोमीटर धावून आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. तर, एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. दिव्यांग, युवा ज्येष्ठांनीही यात सहभाग घेतला. आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही नशामुक्त भारतचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार गोमंतकीयांनी केल्याचे स्पर्धेतून दिसल्याचे स्पष्ट केले.
सदानंद तानावडे यांनी नशामुक्त भारत नमो रनच्या माध्यमातून देशातील युवा व सर्व सामान्य जनतेला नशेपासून मुक्त करताना आदर्श भारत मातेची सेवा करण्याची प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. नमो रनला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आमदार शेट्ये व शेट यांचे विशेष अभिनंदन केले.