नोकरीच्या शोधासाठी गोव्यात आलेल्या तरुणाची रेल्वेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 16:55 IST2019-06-09T16:52:05+5:302019-06-09T16:55:59+5:30
नोकरी शोधण्यासाठी गोव्यात आलेल्या मूळच्या छत्तीसगड राज्यातील एका तरुणाने रेल्वेमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे.

नोकरीच्या शोधासाठी गोव्यात आलेल्या तरुणाची रेल्वेत आत्महत्या
मडगाव - नोकरी शोधण्यासाठी गोव्यात आलेल्या मूळच्या छत्तीसगड राज्यातील एका तरुणाने रेल्वेमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. अजय प्रदेशराम यादव (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी गोव्यातील मडगाव येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वे क्रमांक 10103 या गाडीने थांबा घेतला होता. मुंबई - मडगाव या मार्गावर ही रेल्वे धावत असून अजय हा या रेल्वेतून प्रवास करीत होता. मडगाव रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर अन्य प्रवासी उतरल्यानंतर त्याने चादरने गळफास लावून आत्महत्या केली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. उपनिरीक्षक तुळशीदास मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.
अजयकडे आधारकार्ड तसेच मोबाईलही सापडला आहे. पोलिसांनी मोबाईलच्या मदतीने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर अजयचे नातेवाईक गोव्याकडे रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अजय यादव हा छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील आहे. नोकरी नसल्याने तो कामासाठी छत्तीसगडहून मुंबईला आला होता. तेथून तो रेल्वेमार्गे गोव्यात आला होता असे तपासात आढळून आले आहे. अजयकडे मुंबईच्या एका हॉटेलाचे बील सापडले. या हॉटेलमध्ये त्याने जेवण केले होते. तेथून त्याने गोव्याकडे जाणारी रेल्वे पकडली होती. तसेच त्याच्याकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट नव्हते असेही तपासात आढळून आले आहे. रेल्वे मास्तरने अजयने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी यासंबधी कोकण रेल्वे पोलिसांनी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह सध्या गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या शवागरात ठेवला आहे.