महिला आरक्षणाचा अनेकांना बसला फटका; इच्छुक लागले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:23 IST2025-11-08T09:22:56+5:302025-11-08T09:23:12+5:30
जिल्हा पंचायत निवडणूक २०२५: धाकू मडकईकर, शंकर चोडणकर यांची संधी हुकली, प्रियोळमध्ये गोविंद गावडेंच्या भूमिकेबाबत उत्कंठा

महिला आरक्षणाचा अनेकांना बसला फटका; इच्छुक लागले कामाला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: जिल्हा पंचायत मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक विद्यमान झेडपींना फटका बसला आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे विद्यमान अध्यक्ष धाकू मडकईकर तसेच माजी अध्यक्ष शंकर चोडणकर यांची संधी हुकली आहे. काही मतदारसंघांमध्ये आमदारांनी आपली पत्नी किंवा नातेवाईकांना रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे.
धाकू मडकईकर हे निवडून आलेला सेंट लॉरेन्स मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव झालेला आहे तर चोडणकर हे निवडून आलेला मयें मतदारसंघ खुल्या वर्गवारीत महिलांसाठी आरक्षित आहे. चिंबल मतदारसंघात भाजपचे नेते गिरीश उस्कईकर यांची निराशा झाली आहे. हरमलमध्ये अपक्ष रंगनाथ कळशांवकर हे गेल्यावेळी निवडून आले होते. हा मतदारसंघ महिला राखीव झाला. सत्तरीत सगुण वाडकर यांचा मतदारसंघ ओबीसी राखीव झाला.
कविता कांदोळकरना पुन्हा संधी
माजी आमदार किरण कांदोळकर यांची पत्नी कविता कांदोळकर गेल्यावेळी कोलवाळ मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. हा मतदारसंघ आता महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना पुन्हा संधी आहे. कळंगुटमध्ये भाजपचे विद्यमान सदस्य दत्तप्रसाद मुरारी दाभोळकर यांची संधी हुकली आहे. रेइश मागुशमध्ये भाजपचे रुपेश नाईक यांची निराशा झालेली आहे.
बोरी, बार्सेतही बदल
दक्षिण जिल्हा पंचायतीतील बोरी मतदारसंघ आता महिलांना राखीव झाला आहे. गेल्यावेळी येथे भाजपचे दीपक बोरकर हे निवडून आले होते. त्यांची संधी हुकली आहे. बार्से मतदारसंघात भाजपचे खुशाली वेळीप हे निवडून आले होते. हा मतदारसंघही आता महिला राखीव झाला आहे.
प्रियोळमध्ये उत्कंठा
दक्षिण गोवा जि. पं. मधील वेलिंग-प्रियोळमध्ये गेल्यावेळी मगोपचे दामोदर गोविंद नाईक निवडून आले होते. हा मतदारसंघ आता महिलांसाठी राखीव झाला आहे. भाजप व मगोप युती आहे त्यामुळे आमदार गोविंद गावडे या मतदारसंघात काय भूमिका घेतात ते पहावे लागेल. शिरोडा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपचे नारायण कामत निवडून आले होते. मगोपनेही आपला उमेदवार ठेवला होता. आता हा मतदारसंघ महिला राखीव झाला.
हरमल मतदारसंघातून अनेकजण इच्छुक
हरमल मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने आमदार जीत आरोलकर यांच्या पत्नी सिद्धी रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येते. भाजपच्या तिकिटासाठी त्यांचा प्रयत्न चालू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. गेले काही महिने सिद्धी या समाजकार्यात सक्रीय होत्या. जि. पं. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा राजकारण प्रवेश होणार आहे. या मतदारसंघात अनेकजण इच्छूक आहेत.
पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढवणार : सिद्धेश
खोर्ली मतदारसंघ खुल्या वर्गवारीत आहे. श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश हे या ठिकाणी विद्यमान सदस्य आहेत. जि. पं. अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. निवडणुकीबाबत त्यांना विचारले असता पक्षाने तिकीट दिल्यास आपण निश्चितच ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना १८ तर ओबीसींना १३ मतदारसंघ राखीव
गोवा राज्य निवडणूक आयोगाने उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारसंघांचे आरक्षण अधिसूचित केले आहे. महिलांसाठी १८ मतदारसंघ राखीव आहेत. तर ओबीसींना १३, एसटींना ६ (महिलांसह) व एससींसाठी एक मतदारसंघ राखीव आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजी घेण्याचे याआधीच जाहीर झालेले आहे. यासंबंधीची अधिसूचना कालांतराने येणार असून त्या दिवसापासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. गोवा पंचायत राज अधिनियम १९९४ च्या कलम ११८ अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून आयोगाने आरक्षण अधिसूचना जारी केली.
निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या तसेच गोवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मिळालेल्या मागासवर्गीय घटकांच्या आकडेवारीचा विचार करून हे आरक्षण निश्चित केले आहे.