आयआयटी प्रकल्पासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणार: कृषिमंत्री रवी नाईक यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:04 IST2025-09-27T13:04:32+5:302025-09-27T13:04:46+5:30
कोडार ग्रामस्थांकडून निवेदन

आयआयटी प्रकल्पासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणार: कृषिमंत्री रवी नाईक यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आयआयटी प्रकल्पाला कोडार येथे न आणता अन्य ठिकाणी हलवण्यात यावा व आपली शेती, बागायती वाचवण्यात मदत करावी, अशी मागणी कोडार येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांच्याकडे केली. शेतकऱ्यांनी मंत्री नाईक यांची भेट घेत त्यांना आयआयटी प्रकल्पाला विरोध दर्शवणारे निवेदन सादर केले. या प्रश्नी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलणार आहे, असे मंत्री नाईक यांनी सांगितले.
मंत्री नाईक म्हणाले, की कोडार बेतोडा येथील शेतकरी अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शेती, बागायती करून उदर्निवाह करतात. यापुढेही त्यांना शेती, बागायती करायची आहे, त्यामुळे ही जमीन राखून ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एसटी समाजाचा हा प्रश्न मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मांडणार आहे.
शेतकरी ज्ञानेश्वर खांडेपारकर यांनी सांगितले, की रवी नाईक हे बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यांना बहुजन समाजाविषयी तळमळ आहे. याच अपेक्षेने त्यांना निवेदन सादर केले आहे. ते कृषिमंत्री असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना माहीत आहेत. ज्यांना या ठिकाणी आयआयटी प्रकल्प यावा असे वाटते, त्यांनी या भागात येऊन पाहणी करावी व शेतकरी या प्रकल्पाला का विरोध करतात, हे जाणून घ्यावे.
ती बैठक अद्यापही नाही
कोडार येथील ग्रामस्थ स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर यांना भेटले होते. मंत्री शिरोडकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडून आणणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यासाठी अजूनपर्यंत कोणतीही हालचाली झालेल्या नाही. या प्रकल्पाविषयी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे चुकीची माहिती पुरविण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. यासंबंधी पंचायतीच्या पंच सदस्यांची बैठक झाली असून जर सरपंचांना काही कारणास्तव बैठक घेता येत नसेल तर त्यांनी उपसरपंचांना बैठक घेण्याची परवानगी द्यावी. काही पंच सदस्य ग्रामसभा घ्यायला तयार आहेत, असेही खांडेपारकर म्हणाले.
अनेकांना निवेदने
कोडार येथील शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी विविध पक्षांतील नेत्यांना निवेदन सादर केले आहे. त्यात आमदार गोविंद गावडे, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, सभापती गणेश गावकर, मंत्री रमेश तवडकर, खासदार विरियातो फर्नांडिस, आरजीचे आमदार वीरेश बोरकर, आपचे नेते अमित पालेकर यांचा समावेश आहे.