लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात ७ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास पालकांचा विरोध आहे. त्यामुळे आपण हा विषय लोकसभा अधिवेशनात मांडणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही पालकांचा विरोध कळवणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी दिली.
नवे शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे, मात्र त्याला पालकांचा विरोध कायम आहे. याबाबत रविवारी येथील लोहिया मैदानावर 'नो स्कूल इन एप्रिल' या बॅनर खाली पालकांची सभा झाली. यावेळी खासदार फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. सुमारे तीनशेहून अधिक पालक यावेळी उपस्थित होते. सभेला फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस, वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, सावियो कुतिन्हो, प्रतिमा कुतिन्हो, मारियो मोरेनास व पालक, विद्यार्थी उपस्थित होते. एप्रिलमध्ये शाळा सुरू करू नये, या मागणीसाठी काही विद्यार्थ्यांनी कवितांही सादर केल्या.
खासदारांना दिले निवेदन
यावेळी सिसिल रॉड्रिग्स यांनी खासदार फर्नाडिस यांना एप्रिलमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू करू नये, या मागणीचे निवेदन दिले. आपण पालकांचा विरोध केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना कळवणार आहे, असे सांगून सरकार एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करून मुलांचा आनंद हिरावून घेऊ पाहत असल्याची टीका खासदार फर्नांडिस यांनी केली. आमदार व्हिएगस म्हणाले, की एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे गरजेचे आहे. ७ एप्रिल रोजी पालकांनी मुलांना शाळेत पाठवून शाळेच्या बाहेर हातात फलक घेऊन आंदोलन करावे.
हे सरकार अहंकारी : विजय सरदेसाई
आमदार सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. सरकार लोकशाही नव्हे तर हुकूमशाही पद्धतीने चालवले जात असल्याचे ते म्हणाले. अहंकार आडवा येत असल्याने सरकार निर्णयात बदल करत नाही. सरकारला हवे असल्यास ऑनलाइन पद्धतीचा वापर करून शैक्षणिक वर्ष सुरू करता येईल, परंतु त्यांना तसे नको आहे. पालकांना व मुलांना त्रास दिला जात आहे. सरकारला जर हा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यार्थी व पालकांचे म्हणणे ऐकून घेऊन जनमताचा कौल घ्यावा. त्यातून सरकारला विद्यार्थ्यांचे मतही कळेल, असेही ते म्हणाले. सभेत अनेकांनी मुलांना शाळेत पाठवून शाळेच्या बाहेर हातात आंदोलन करण्यावर भर दिला.