आयआयटीला जागतिक दर्जाचा कॅम्पस देऊ; दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:30 IST2025-07-14T09:29:48+5:302025-07-14T09:30:02+5:30
इतरांना रोजगार देणारे उद्योजक बनण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला

आयआयटीला जागतिक दर्जाचा कॅम्पस देऊ; दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'आयआयटी गोवाने कमी कालावधीत स्वतःला, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून झपाट्याने प्रस्थापित केले आहे. शैक्षणिक क्षेत्रासह शालेय मुलांना ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रांची ओळख करून देण्यासाठी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांना संयुक्त संशोधन, अध्यापनात सहभागी करून घेण्यासाठी संस्थेने केलेल्या प्रभावी कार्याचे मी कौतुक करतो. हे प्रयत्न राज्याच्या स्वयंपूर्ण गोवा मोहिमेशी आणि अंत्योदयाच्या तत्त्वाशी सुसंगत आहेत. म्हणूनच आयआयटीसाठी लवकरच कायमस्वरूपी जागा देण्यास सरकार कटिबद्ध आहे,' अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
येथे रविवारी 'आयआयटी गोवा'च्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. यावेळी आयआयटीचे संचालक मंडळाचे अध्यक्ष आदिल हौनूलभाई, संचालक प्रो. धिरेंद्र कट्टी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'अभियंते हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. अत्याधुनिक पूल, डिजिटल प्लॅटफॉर्म, प्रक्षेपित झालेले उपग्रह आणि आपण निर्माण करत असलेली स्वच्छ ऊर्जा हे सर्व अभियांत्रिकीच्या सामर्थ्याचे दाखले आहेत. 'विकसित भारत २०४७'च्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. त्याआधी आम्ही 'विकसित गोवा २०३७' हे स्वप्न साध्य करण्यासाठी तितकेच वचनबद्ध आहोत. विकसित, समावेशक, शाश्वत आणि समृद्ध गोवा हे ध्येय धरून आमची वाटचाल सुरू आहे. आयआयटीसारख्या संस्था भविष्यात राष्ट्र उभारणीच्या या प्रवासात महत्त्वाच्या भागीदार असतील.'
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा संदेश
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्हर्चुअल पद्धतीने खास संदेश दिला. दीक्षान्त समारंभात एकूण १५ विद्यार्थ्यांना पीएचडी, तेरा विद्यार्थ्यांना एम. टेक पदवी, १४५ विद्यार्थ्यांना बी. टेकच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या.'
प्लेसमेंट रेट लक्षणीय
मुख्यमंत्री म्हणाले की, 'डिजिटल इंडिया, स्मार्ट शहरे, अक्षय ऊर्जा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या राज्यात आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वातावरण आहे. आमच्या स्टार्टअप आणि नवोन्मेष धोरणांद्वारे, आम्ही तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी व्यासपीठ तयार करत आहोत. केवळ नोकरी शोधणारे म्हणून नव्हे तर नोकरी निर्माण करणारे म्हणून ओळख निर्माण करा. आयआयटीच्या पदवीधरांचा प्लेसमेंट रेट हा लक्षणीय असाच आहे. तुमच्या कठोर परिश्रमाची ती पावती आहे. तुम्हाला मिळालेले मार्गदर्शन, तुमचे शिक्षण हा तुमचा पाया आहे. परंतु मुल्ये भविष्यात तुमची दिशा ठरवतील. पदवी हा तुमचा पासपोर्ट आहे.
हक्काची जागा मिळेल
मुख्यमंत्री म्हणाले की, 'आयआयटीच्या प्राध्यापकांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसह गोव्याला ओळख आणि सन्मान मिळवून दिला आहे. उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्णतेसाठीच्या वचनबद्धतेबद्दल मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो. आयआयटीला हक्काचा कायमस्वरूपी कॅम्पस मिळेल. संस्थेला जागतिक दर्जाच्या कॅम्पसची आवश्यकता आहे याचे भान सरकारला आहे.'
स्टार्टअपमध्ये विद्यार्थ्यांचा प्रभाव : आदिल जैनुल
संचालक मंडळाचे अध्यक्ष आदिल जैनुल यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'जगाच्या विकासात आयआयटीचे योगदान महत्त्वाचे आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून समाजामध्ये स्वतःचा प्रभाव दाखवला आहे. जगाच्या आर्थिक स्थैरतेला तुम्ही पाठबळ देत आहात. ज्या शैक्षणिक संस्थेमधून तुम्ही एवढे प्रचंड ज्ञान संपादन केले आहे, भविष्यात त्या संस्थेसाठी काहीतरी परत देण्याचा नेहमी प्रयत्न करा. पदवीप्रदान समारंभ होत असताना समाजाला तुमच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा सत्यात उतरवून तुमची कुवत सिद्ध करा. माहिती तंत्रज्ञान व प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही देशाकरता काय निर्माण केले यावरून यशाचे मापदंड पुढे ठरत जातील. भारत घडवण्यात तुमची भूमिका महत्त्वाची असेल.'