१०-१२ हजार नोकऱ्या देणारच: मुख्यमंत्री; येत्या दोन वर्षांसाठी लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:49 IST2025-05-17T07:48:36+5:302025-05-17T07:49:38+5:30
कुंभारजुवेत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

१०-१२ हजार नोकऱ्या देणारच: मुख्यमंत्री; येत्या दोन वर्षांसाठी लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य सरकार १०-१२ हजार नोकऱ्या देणारच. मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे पुढील दोन वर्षात चार हजार नोकऱ्या दिल्या जातील. या नोकऱ्यांबाबत सुरक्षितता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात, ते सर्व फायदे या कर्मचाऱ्यांनाही मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कुंभारजुवें मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 'राष्ट्र प्रथम ही भावना ठेवून काम केले जात आहे. देशाच्या संरक्षण तसेच विकासासाठी भाजप सरकारच हवे' असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'पाकिस्तान दूर आहे, म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत असे होत आहे. आम्ही सुरक्षित आहोत, कारण भारतीय नौदल सक्षम आहे. देशाला पंतप्रधान नरेंद मोदी यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. भाजप सरकारने गोव्यातसुद्धा अनेक विकास प्रकल्प उभारले आहेत. राज्याच्या विकाला चालना दिली आहे. या प्रकल्पांना विकास म्हणता येईल. अशा प्रकारचा विकास केवळ भाजप सरकारच करू शकतो.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'काँग्रेस सरकारच्या काळात देशाने अपेक्षित विकास साधला नाही. महत्त्वाच्या अशा कोणत्याही योजना त्यांनी सुरू केल्या नाहीत. काँग्रेस पक्ष हा धर्माच्या आधारे विभाजन करू पहात आहे. मात्र, आम्ही तसे कधीच केलेले नाही. भाजप सरकार लोकांची सेवा करण्यासाठी आहे. ज्यांना काम करण्याची आवड आहे, त्यांनी भाजपमध्ये यावे.' यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कईकर यांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभारजुवे मतदारसंघाचा झपाट्याने विकास
आमदार राजेश फळदेसाई म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी करून दाखवले. जगात भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आहे, कारण पंतप्रधान सर्वांना एकत्र घेऊन चालतात. गोव्यातील भाजप सरकार चांगले काम करीत आहे. राज्य सरकार रोजगार निर्मितीवर भर देत आहे. कुंभारजुवे मतदारसंघाचा भाजप सरकारच्या काळात झपाट्याने विकास सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कधीच विकासकामांसाठी नकार देत नाहीत. २०२७ मध्ये २७ हे ध्येय आम्ही पुढे नेणार आहोत.
भाजप सर्वांना सोबत नेणारा पक्ष : नाईक
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, भाजप पक्ष हा एक परिवार आहे. तो सर्वांना एकत्र घेऊ चालणारा पक्ष आहे. या कार्यकर्त्यांच्या पक्षाचे १४ कोटींहून अधिक सदस्य आहेत. अंत्योदय तत्त्वावर पक्ष चालतो. आमच्या सरकारने अनेक सामाजिक योजना राबविल्या आहेत. सर्वसामान्य घटकांपर्यंत त्या योजना पोहोचाव्यात यावर भर असतो. सामान्यांचा स्तर वाढावा यासाठी लाडली लक्ष्मी, गृहआधार, आरोग्य, शिक्षण योजना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उच्च स्तरावर नेण्यासाठी काम करीत आहेत.
दहशतवाद्यांना चोख उत्तर : तानावडे
खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, 'पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले. मात्र, असे करताना त्यांनी सर्वसामान्यांना त्रास दिला नाही तर तेथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठलाही स्वार्थ न ठेवता देशासाठी काम करतात. भारत आज पायाभूत सुविधा, महिला सशक्तीकरण, शिक्षण, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रांत ताकदवान देश बनला आहे. मोदी यांचे सशक्त नेतृत्व देशाला लाभले आहे. २०४७ पर्यंत भारत देशाला महाशक्ती बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.