...तोपर्यंत खाणी सुरू होऊ देणार नाही; मुळगाव ग्रामस्थ मागणीवर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:56 IST2026-03-05T11:55:20+5:302026-03-05T11:56:20+5:30
बफर झोनसह रात्रीचे उत्खनन मुद्दा तीव्र

...तोपर्यंत खाणी सुरू होऊ देणार नाही; मुळगाव ग्रामस्थ मागणीवर ठाम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुळगाव : जोपर्यंत २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार बफर झोनचे सीमांकन होत नाही आणि रात्री केले जाणारे उत्खनन बंद केले जात नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत खाण काम सुरू होऊ देणार नाही, असा ठाम निर्णय मुळगाव ग्रामस्थांनी घेतला. 'आता नाही तर कधीच नाही' असा निर्धार करत ग्रामस्थांनी बुधवारी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
ग्रामस्थांनी सलग तीन दिवस वेदांता कंपनीचे खाणकाम बंद पाडल्यानंतर उपजिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर बैठक झाली. यावेळी देवस्थान समिती, शेतकरी समिती, कोमुनिदाद संस्था, नागरिक कृती समिती यांसह सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शेर्लेकर, सुरेंद्र गाड, मनोज गाड, पुतूलो गाड, संतोष सराफ, नरेश परब, झिलू परब, बिरजू राऊत, केशव परब यांच्यासह गावकरवाडा आणि मानसबाग या दोन्ही वाड्यांतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेकडो नागरिक उपस्थित होते.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावातील शेवटच्या घरापासून केवळ ५० मीटर अंतरापर्यंत बफर झोन निश्चित करण्याचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांच्यासमोर मांडला. मात्र, याला संतप्त नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसारच बफर झोन निश्चित करावा, अन्यथा खाणकाम बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी सांगितले की, या सार्वजनिक सुनावणीपूर्वीच्याच मागण्या आहेत. गावातील मुख्य मंदिर, इतर देवळे, ग्रामपंचायत, शाळा आणि अनेक घरे खाण लीज क्षेत्रात येत असल्याने सुरुवातीपासूनच या खाणीला विरोध आहे. गेल्या तीन वर्षात अनेक बैठका आणि वारंवार मागण्या करूनही ठोस निर्णय न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याउलट, गेल्या दोन वर्षात कंपनीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
खाणीवर दोन वेळा दुर्घटना होऊन यापूर्वी सहा जणांचा बळी गेल्याचे नमूद करत 'आणखी किती बळींची वाट पाहत आहात?' असा सवालही उपस्थित करण्यात आला. गरज पडल्यास खाणीवर जाऊन बेमुदत आमरण उपोषण करण्याची तयारी नागरिकांसह महिलांनी दर्शविली आहे.
उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत बफर झोनविषयी सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन दिले. मात्र, तोपर्यंत खाणकाम बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी कायम ठेवला.
आमदारांचा ग्रामस्थांना पाठिंबा
यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा देत आपण जनतेच्या बाजूने आहोत, असे स्पष्ट केले. रात्रीचे उत्खनन तत्काळ बंद करण्याच्या मागणीवरही ग्रामस्थ ठाम राहिले. दोन्ही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कंपनीने खाणकाम सुरू करण्याचा विचारही करू नये, असा इशारा देण्यात आला.
कायद्याच्या चौकटीतच खाणकाम : वेदांता
उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वेदांता सेसा गोवाने स्पष्ट केले की, खाणीतील सर्व कामकाज कायदे व नियमांचे पूर्ण पालन करूनच केले जाते. बफर झोन निश्चिती संदर्भात लागू नियमांनुसार घरांपासून ५० मीटर अंतर राखले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. कंपनी त्यानुसारच कार्यरत आहे. रात्रीच्या कामकाजाबाबत ध्वनीप्रदूषणाची नियमित तपासणी केली जाते. ध्वनीपातळी निर्धारित मर्यादेत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. खाणकामात वारंवार व्यत्यय चिंताजनक आहे, असे कंपनीने म्हटले आहे.