मडगावला आदर्श पालिका करणार: दिगंबर कामत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 07:37 IST2025-03-10T07:36:37+5:302025-03-10T07:37:21+5:30
उत्तर प्रदेशचे योगी सरकार मॉडेल गोव्यात सुरू करणार, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

मडगावला आदर्श पालिका करणार: दिगंबर कामत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : येथील नगरपालिकेला एक आदर्श पालिका करणार आहे. जे लोक आपली कामे घेऊन पालिकेत येतात, त्यांना पुन्हा-पुन्हा पालिकेत खेपा मारायला पडू नये. एक ते दोन वेळा पालिकेत आल्यावर त्यांची कामे व्हायला हवीत. यासाठी उत्तर प्रदेशचे योगी सरकार मॉडेल गोव्यात सुरू करणार, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
आमदार कामत यांच्या वाढदिवसानिमित्त मालभाट येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम मडगाव नगरपालिका, शिमगोत्सव समिती व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता. येत्या १ एप्रिल पासून आपण मडगावच्या विकासासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करणार व लोकांना न्याय मिळवून देणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. उत्तर प्रदेशात केवळ एक ते दोन खेपा मारल्यावर कामे होतात. त्याच धर्तीवर गोव्यात गुड गव्हर्नन्स देण्याचा आपला विचार असून सुरुवात मडगाव पालिकेपासून करणार, जे कोणी याच्या आड येतील त्याला वेगळा पर्याय शोधू असे कामत म्हणाले.
'मी केवळ देव नागेश, देव दामोदर यांनाच मानतो'
आपण जो काही आज आहे, तो कार्यकर्त्यांच्या बळावर आहे. सुरुवातीला ज्यावेळी आपण आमदार झालो होतो, त्यावेळी आपण विरोधी पक्षात होतो. त्यावेळी मडगाव नगरपालिकेत आपले केवळ दोन नगरसेवक होते. आपले कार्यकर्त्याशी जे संबध आहेत ते कुठेच कमी पडू दिले नाहीत. आपण श्री देव नागेश व श्री देव दामोदर यांना मानतो. त्याशिवाय कुणालाच मानत नाही. त्यांच्यावर आपला ठाम विश्वास आहे. देवाच्या मनात असेल तेच होईल, असेही कामत म्हणाले.
'दिवसा झाला रात्रीचे बारा वाजल्याचा भास'
आपला वाढदिवस दरवर्षी रात्री १२ वाजता साजरा केला जात असे. यावर्षी लग्न समारंभाचे निमंत्रण असल्याने वाढदिवस सोडून गोव्याबाहेर जावे लागले. आपला वाढदिवस यावेळी दिवसा साजरा केला, परंतु आपल्याला रात्रीचे बारा वाजल्याचा भास झाला. हेच असेच वातावरण रात्रीचे असायचे. आजही तेच वातावरण आपल्याला दिसून आले, असे कामत म्हणाले.