थिवीतूनच लढणार आणि जिंकणार; मनोज परब यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:14 IST2025-09-28T13:13:49+5:302025-09-28T13:14:19+5:30
पीर्ण वादानंतर प्रत्युत्तर

थिवीतूनच लढणार आणि जिंकणार; मनोज परब यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : थिवी मतदारसंघातून आपण पुढील निवडणूक थिवीतूनच लढवणार आणि जिंकूनही दाखवणार, असे प्रत्युत्तर आरजीपीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी दिले. तसेच मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केलेल्या आरोपांवर उत्तरही दिले.
थिवी येथील आरजीच्या कार्यालयात परब बोलत होते. जीएसटी उत्सव साजरा करण्यासाठी पीर्ण येथे मंत्री हळर्णकर गेल्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आरोपांचे सत्र सुरू झाले होते. मंत्र्यांनी फक्त पत्रकांचे वाटप केले. मात्र, जीएसटीसंदर्भात माहिती देणे टाळले. पीर्ण येथे आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले, असे परब म्हणाले.
...तर ग्रामसभेला का नाही?
मंत्र्यांनी पंचायतराज कायद्यावर भाष्य करू नये. ग्रामसभेत ग्रामस्थांसोबत चर्चा करणे हे संबंधित आमदाराचे कर्तव्य असते. आमदार या नात्याने त्यांनी लोकांशी एकदाही संवाद साधलेला नाही. आपण जर लोकांना भडकावत आहे, तर पंचायतीने लोकांना कारणे दाखवा नोटिसा का बजावल्या आहेत, यावर मंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावे. ते यशस्वी झाले, तर आपण माफी मागेन, असे परब म्हणाले.
परप्रांतीयांबाबत खुलासा करावा
कोलवाळ परिसरात मंत्री हळर्णकर यांनी परप्रांतीय मतदारांचा भरणा केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना घरे दिली आहेत. परप्रांतीयांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. सरकारी योजनांचा लाभ दिला आहे, यावर खुलासा करावा, अशी मागणी मनोज परब यांनी केली.