२०२७ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणूनच लढवणार: उत्पल पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:55 IST2026-03-18T07:55:09+5:302026-03-18T07:55:09+5:30
माझ्या वडिलांचा वारसा पाहता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकत नाही. भाजपने उमेदवारी दिली असती तर माझा विजय निश्चित होता, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

२०२७ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणूनच लढवणार: उत्पल पर्रीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ ची विधानसभा निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. माझ्या वडिलांचा वारसा पाहता मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकत नाही. जर भाजपने मला २०२२ मध्ये उमेदवारी दिली असती तर माझा विजय निश्चित होता, असेही ते म्हणाले.
या मुलाखतीत उत्पल पर्रीकर यांनी नगरनियोजन खात्याच्या 'कलम ३९ ए'ला जोरदार विरोध केला. ते म्हणाले की, या कलमामुळे राज्यातील गावागावातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. झोन बदलांमुळे लोकांच्या जमिनी आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे आवश्यक आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
उत्पल यांनी कॅसिनो व्यवसायावर निर्बंध घालण्याची मागणी केली. मांडवी नदीतील कॅसिनोच्या समस्येवर त्यांनी कडक भूमिका घेतली. मांडवीतून कॅसिनो पूर्णपणे हटवले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केवळ घोषणा न करता सरकारने कायदेशीर मार्गाने ठोस पावले उचलून नवीन पर्यटन धोरण लागू करावे. नव्या जुता हाऊसच्या १३ व्या मजल्यावर नियोजित असलेल्या कॅसिनोलाही त्यांनी कडाडून विरोध केला आहे.
बाबूश सरकारवर दबाव आणतात
उत्पल यांनी एका प्रश्नावर पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या कुटुंबावर थेट निशाणा साधला आहे. कुटुंबातील सदस्यांना राजकारणात आणून आणि त्यांचा वापर करून सरकारवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारची घराणेशाही लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.