आलेक्स सिक्वेरा मंत्रिपद सोडणार? राजीनामापत्र कधीही शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:26 IST2025-08-20T12:25:43+5:302025-08-20T12:26:24+5:30
जीएसटीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री दोन दिवस दिल्लीत

आलेक्स सिक्वेरा मंत्रिपद सोडणार? राजीनामापत्र कधीही शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून मंत्रिपद सोडण्याची दाट शक्यता आहे. या आठवडाभरात कधीही हे शक्य आहे. शुक्रवारपर्यंत ते राजीनामा सादर करतील, अशी चर्चा भाजपच्या आतील गोटात पसरली आहे. तसे घडल्यास मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या स्तरावर दिल्लीत ठरले आहे. या पार्श्वभूमीवर ते त्यागपत्र देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सिक्वेरा हे आजारी असल्याने गेला काही काळ दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही यापूर्वी झाली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. दामू नाईक यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी तासभर चर्चा केली व अधिवेशनातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच रिपोर्ट कार्डेही तयार केली होती.
आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे पर्यावरण, कायदा अशी महत्त्वाची खाती आहेत. मुख्यमंत्र्यांकडे अगोदरच २४ खाती आहेत. मंत्रिमंडळात एक जागा गोविंद गावडे यांच्यामुळे यापूर्वी रिकामी झालेली आहे. आलेक्स सिक्वेरा हे आजारातून पूर्ण बरे झाले असते तर विषय वेगळा होता. त्यांना अजून काळजी घ्यावी लागते. त्यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थिती लावली होती. परंतु ती देखील नावापुरतीच. आजारपणामुळे सभागृहात त्यांची कामगिरी ठीक होऊ शकलेली नाही याची कल्पना भाजपच्या नेत्यांना आहे. त्यांच्या खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला सभागृहात मुख्यमंत्र्यांनाच उत्तरे द्यावी लागली.
दुसरीकडे काँग्रेसमधून फुटून आलेल्या आठ आमदारांपैकी दिगंबर कामत यांचे मंत्रिपद गेला बराच काळ रखडले आहे. आज होईल, उद्या होईल या आशेवर ते आहेत. दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी 'माझा शपथविधी होईल तो दिवस खरा, मंत्रिपद मिळणार अशा वावड्या रोजच उठतात' असे वक्तव्य करून अजून मंत्रिपद न मिळाल्याने काहीशी नाराजीच व्यक्त केली होती.
दरम्यान, पर्तगाळ मठाच्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आमदार दिगंबर कामत हेही दिल्लीला जाणार आहेत. एक आघाडीचे गोमंतकीय उद्योगपतीही त्यांच्यासोबत असतील.
मुख्यमंत्री दिल्लीत, पंतप्रधानांना भेटणार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत जीएसटी कौन्सिलच्या मंत्रिगटाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. दोन दिवस ते दिल्लीत असतील. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सावंत यांना अपॉइंटमेंट दिलेली आहे. सावंत या काळात काही केंद्रीय नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण आणि अनुपालन भार कमी करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाची बैठक आज व उद्या (२० व २१) असे दोन दिवस दिल्लीत होणार आहे. बैठकीतील शिफारशींना अंतिम स्वरूप देण्यात येईल. बैठकीत चर्चा झालेले प्रस्ताव त्यानंतर जीएसटी परिषदेसमोर ठेवण्यात येतील ही परिषद सप्टेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे.
तवडकर यांना मंत्रिपद मिळावे : लोबो
दरम्यान, मंत्रिमंडळात एसटी समाजाचे नेते म्हणून रमेश तवडकर यांची वर्णी लावावी, असे आमदार मायकल लोबो यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, 'मंत्रिमंडळात एक जागा रिकामी आहे. ती एसटी समाजाच्या आमदाराला मिळायला हवी. संसदेत एसटी आरक्षण विधेयक संमत झालेले आहे. या जागेसाठी तवडकर यांच्या नावाचा विचार व्हावा.'
मुख्यमंत्रीच सांगू शकतील : दामू नाईक
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना पत्रकारांनी 'चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळ फेररचना होणार आहे का?' असे विचारले असता ते म्हणाले की, 'हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा. तेच उत्तर देऊ शकतील.' भाजप कार्यालयांमध्ये होणाऱ्या बैठकांच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, 'पक्षाच्या विविध आघाड्या, समित्यांवर नावे निश्चित व्हायची आहेत. राज्य कार्यकारिणीवरही नियुक्ती व्हायची आहे. त्यामुळे संघटनात्मक कामासाठीच बैठका होत असतात.'