Coronavirus: कोरोनाकाळात गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रात्री उशिरा का होत होते मृत्यू? समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 17:50 IST2021-10-18T17:45:01+5:302021-10-18T17:50:28+5:30
Coronavirus In Goa: गोव्यातील सरकारी रुग्णालय गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मे महिन्यात रात्री उशिरा होणाऱ्या मृत्यूंचे कारण समोर आले आहे.

Coronavirus: कोरोनाकाळात गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रात्री उशिरा का होत होते मृत्यू? समोर आलं धक्कादायक कारण
पणजी - गोव्यातील सरकारी रुग्णालय गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मे महिन्यात रात्री उशिरा होणाऱ्या मृत्यूंचे कारण समोर आले आहे. मे महिन्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, या रुग्णालयात रात्री २ ते सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू होत होते. प्राथमिक तपासामध्ये ऑक्सिजन सिलेंडर बदलत असताना हे मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तीन सदस्यीय टीमने आपल्या तपास अहवालात सांगितले की, जीएमसी रुग्णांची संख्या सांभाळू शकले नाही, त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या. हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाले नाहीत, असे या अहवालात सांगण्यात आले. तसेच जीएमसीने तज्ज्ञांचा सल्ला मानला नाही, असा ठपकाही या अहवालातून ठेवण्यात आला.
या अहवालानुसार ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टरने न सांगता जीएमसीला खासगी रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवणे बंद केले. त्यामुळे जीएमसीवर रुग्णांचा भार वाढला. या प्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे महासचिव दुर्गादास कामत यांनी सांगितले की, या रिपोर्टमुळे मृत्यूचे कारण काय आहे हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात भाजपाला खुनी म्हणणे योग्य ठरेल. आम्ही सुरुवातीपासून मृत्यूंसाठी महत्त्वाचे कारण ऑक्सिजन असल्याचे सांगत होते. आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. आता याची जबाबदारी घेऊन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
दुसरीकडे गोवा विधानसभेच्या अधिवेशनामध्येही विरोधी पक्षाकडून हा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मे महिन्यामध्ये १० मेपासून १३ मेपर्यंत गोव्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयामध्ये रात्री दोन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत सतत तीन दिवसांपर्यंत रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर सरकारने या मृत्यूंच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची एक टीम तयार केली होती. या टीमने आपला रिपोर्ट आता सादर केला आहे.