Goa BJP State President Damu Naik Replied Maharashtra DCM Ajit Pawar: मनोहर पर्रीकरांना कमी लेखणे किंवा ते माहिती नसणे म्हणणे, यातून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याचे राजकीय अज्ञान दिसून येते, असा पलटवार गोव्यातील भाजपा नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.
पुण्याच्या काही भागातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते. इथल्या समस्या बघता इथे राहायचे की नाही, हा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे त्रस्त झालेल्या पुणेकर महिलेने सांगतानाच जसे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसेच तुम्ही फिर, असा सल्ला दिला. यावर अजित पवार म्हणाले की कोण पर्रीकर? त्यावर महिला म्हणाली की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिवसा फिरायचे ट्रॅफिक बघण्यासाठी तसे तुम्ही कधीतरी ट्रॅफिकची वेळ असते, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, असे नाही की माहिती होऊ शकत नाही, असे महिलेने सांगितले. कोण पर्रीकर, या अजित पवार यांच्या प्रश्नाचा गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पवारांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
अजित पवार हे वेड पांघरून पेडगांवला जात असावेत
'पर्रीकर कोण? असे विचारून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले राजकीय अज्ञान व्यक्त केले असावे किंवा ते वेड पांघरून पेडगांवला जात असावेत, अशी जोरदार टीका दामू नाईक यांनी केली. ते म्हणाले की, पर्रीकरांचे कार्य सर्व जगाला ठाऊक आहे. मुख्यमंत्री तसेच केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे. मनोहर पर्रीकर हे केवळ गोव्याचेच नव्हे, तर देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव होते. त्यांचे शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. ते एक कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेते होते, असे दामू नाईक यांनी नमूद केले.
दरम्यान, अजित पवारांच्या वक्तव्यावर नाईक म्हणाले की, मनोहर पर्रीकर हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या नावाने केवळ गोवाच नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ यासारख्या मोठ्या शहरांमध्येही अनेक संस्था आणि केंद्रे उभारण्यात आली आहेत.