ज्याच्याकडे गोमाता आहे, तोच श्रीमंत : दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:10 IST2025-10-23T10:09:29+5:302025-10-23T10:10:47+5:30
विर्नोडा येथे भावका देवी सांस्कृतिक युवा मंडळ-खालचावाडा यांनी गोमाता पूजन केले.

ज्याच्याकडे गोमाता आहे, तोच श्रीमंत : दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : शेती, दूध उत्पादनापासून युवा पिढी दूर जात असल्याचे दिसून येते. परंतु ज्याच्याकडे गोमाता आहे, तोच खरा श्रीमंत आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले. विर्नोडा येथे भावका देवी सांस्कृतिक युवा मंडळ-खालचावाडा यांनी गोमाता पूजन केले. त्यानिमित्ताने गावातील शेतकऱ्यांचा गौरव सोहळा आणि गोमातेचे पूजन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाईक बोलत होते.
यावेळी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, माजी मुख्यमंत्री तथा प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, सरपंच अक्षदा सावंत, पंच उदय मांद्रेकर, पंच प्रदीप परब, भावका देवी सांस्कृतिक युवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष सीताराम परब, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर विठू मोरजकर, चांदेल-हसापूरचे सरपंच बाळा शेटकर, मोपा-उगवेचे सरपंच सुबोध महाले, भास्कर नारुलकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन झाले. ऋषिका परब यांनी सूत्रसंचालन केले.
पार्सेकर म्हणाले, की पूर्वजांनी ज्या परंपरा, सण, उत्सव टिकवून ठेवले होते. तिच परंपरा आजच्या पिढीने पुढे नेण्याची गरज आहे. दिवाळी हा प्रकाशाचा, प्रेरणा देणारा उत्सव आहे. गाय स्वतःच्या वारसाचे पालन करून आम्हालाही दूध पुरवठा करते, त्यामुळे ती गोमाता आहे.
सोपटे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये संस्कृतीचे जतन करताना गोमातेचे पूजनही केले जाते. त्याचा प्रसार आणि प्रचार भावी पिढीपर्यंत व्हावा, यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात. सरपंच सावंत यांनीही मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. सरकारने विर्नोडा पंचायतीची महसूल वाढ आणि विकासाला गती देण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुलीला लग्नात गोमाता द्या
काही पालक नववधूला मोठ्या महागड्या गाड्या किंवा इतर वस्तू भेट देतात. त्यापेक्षा गोमाता भेट म्हणून दिली तर एक चांगला उपक्रम होऊ शकेल, असे मत दामू नाईक यांनी व्यक्त केले. आर्थिक सुबत्ता, स्वयंपूर्ण भारत आणि गोवा हे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर महिला सेल्फ हेल्प ग्रुपने एकत्रित येऊन गोमातेचे संरक्षण करण्याबरोबरच दुग्ध व्यवसाय केला तर आर्थिक सुबत्ता नक्कीच येईल, असेही ते म्हणाले.
मंडळाकडून संस्कृतीचे संवर्धन
आमदार आरोलकर म्हणाले, की आमची संस्कृती जोपासण्याची, ती टिकवण्याचे काम अशा कार्यक्रमातून होते. या संस्थेने चांगला विधी आयोजित करून एक चांगले पाऊल टाकले आहे. पुढील पिढीला संस्कृतीचा मार्ग दाखवायचा असेल तर अशा कार्यक्रमांचे वारंवार आयोजन होणे गरजेचे आहे.