मंत्रिपदाचा मुहूर्त कधी? गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना अन् दिगंबर कामतांच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:13 IST2025-08-20T12:12:18+5:302025-08-20T12:13:18+5:30
दिगंबर कामत हे एरवी खूप सहनशील. मात्र, त्यांनी आता आपली भावना व्यक्त करणे सुरू केले आहे.

मंत्रिपदाचा मुहूर्त कधी? गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना अन् दिगंबर कामतांच्या नावाची चर्चा
गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना आता होईलच. निदान मंत्रिमंडळात दोन नवे चेहरे येतील, असा दावा भाजपचेच काही पदाधिकारी करत आहेत. हे नवे चेहरे म्हणजे दिगंबर कामत व रमेश तवडकर असेही सांगितले जाते. तवडकर यांनी अजून सभापतिपदाचा राजीनामा दिलेला नाही. ते मंत्रिपदासाठी उतावीळही नाहीत, असा दावा काहीजण करतात. मात्र, कोणताच राजकारणी मनात नेमके काय आहे, ते कधी स्पष्टपणे जाहीर करत नसतो.
दिगंबर कामत हे एरवी खूप सहनशील. मात्र, त्यांनी आता आपली भावना व्यक्त करणे सुरू केले आहे. परवा डिचोलीत त्यांना मीडियाने मंत्रिपदाविषयी विचारले. त्यावर कामत यांनी दिलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. 'जेव्हा शपथविधी होईल तेव्हाच खरे, मला मंत्री केले जाईल अशा बातम्या अधूनमधून येत असतात; पण मी मंत्री नसलो, तरी माझे काम सुरूच आहे, असे कामत म्हणाले.' कामत एकेकाळी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी होते. त्यांनी मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या आक्रमक विरोधी पक्षनेत्याचा सामना केला होता. शिवाय रवी नाईक, विश्वजित राणे, चर्चिल आलेमाव, ज्योकिम आलेमाव, दयानंद नार्वेकर अशा रथी-महारथींना मंत्रिमंडळात ठेवूनही कामत यांना संघर्षच करावा लागला होता. नार्वेकर यांचा राजीनामा घेण्याची चाल नंतर त्यांना खेळावी लागली होती, हा वेगळा विषय आहे. मात्र, कामत यांनी 'देव तारी त्याला कोण मारी' असे म्हणत पाच वर्षे राज्यकारभार चालवला होता.
वर्ष २००७ मध्ये कामत जेव्हा मुख्यमंत्रिपदी होते तेव्हा प्रमोद सावंत आमदारदेखील नव्हते. तेच सावंत आता गेली सहा वर्षे मुख्यमंत्रिपदी आहेत आणि त्यांच्या हाताखाली मंत्री म्हणून कामत यांनी काम करावे, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. कामतही आपल्याला मंत्रिपद नको असे म्हणत नाहीत. अर्थात त्यांनी तसे म्हणावे अशी कुणाचीच इच्छा नाही. सावंत यांच्या मंत्रिमंडळात रवी नाईक हेही एक माजी मुख्यमंत्री सध्या कृषिमंत्री म्हणून काम करतात. दिगंबर कामत यांचा चतुर्थीपूर्वी शपथविधी झाला तर आणखी एक माजी सीएम मंत्रिमंडळात आले असा अर्थ होईल. तसे घडले तर प्रमोद सावंत हे खऱ्या अर्थाने नशीबवान मुख्यमंत्री आहेत, असे म्हणता येईल. वय कमी असले, तरी दोन ज्येष्ठ माजी मुख्यमंत्री त्यांचे मंत्री झालेत, असा अर्थ होईल. कामत यांना भाजपच्या हायकमांडने बराचकाळ तिष्ठत ठेवले आहे. त्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणताना योग्य तो मान राखला जाईल, अशी हमी दिली गेली होती. कामत भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामागे कधीच चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला नाही. शिवाय कथित खाण घोटाळादेखील भाजप पार विसरून गेला. पर्रीकरांनी मुख्यमंत्रिपदी असताना मात्र कामत यांना पळता भुई थोडी केली होती. कामत जेव्हा मंत्री होतील, तेव्हा नियतीने आपल्याला न्याय दिला अशा प्रकारची भावना कदाचित कामत यांच्या मनात दाटून येईल.
आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री करणे ही भाजपची यापूर्वीची घोडचूक ठरलेली आहे. सिक्वेरा यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला ख्रिस्ती मतदारांची सासष्टीत तरी मते मिळतील असे हायकमांडला वाटले होते; पण तसे घडले नाही. आलेक्स सिक्वेरा आता आजारी असल्याने स्वतःच्या कामालाही न्याय देऊ शकत नाहीत. अशावेळी सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वतःच बाजूला होणे योग्य ठरेल. त्या जागीच कामत यांची वर्णी लागेल, अशी चर्चा गेले दोन दिवस सुरू आहे.
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर लगेच तवडकर यांना ती खुर्ची दिली जाईल असे ढोल अनेकांनी वाजवले होते. मात्र, तवडकर यांनी अजून सभापतिपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना मंत्री करा, असा आदेश अजून दिल्लीहून आलेला नसावा. मायकल लोबो, संकल्प आमोणकर यांचेही लक्ष मंत्रिपदाकडे लागून आहे.
वास्तविक नीलेश काब्राल यांच्याकडून मंत्रिपद काढून घेणे हा काब्राल यांच्यावर अन्याय होता. काब्राल यांना पुन्हा मंत्री करण्यास मुख्यमंत्री तयार होणार नाहीत. चतुर्थीसाठी आता सात-आठ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे ठामपणे म्हणता येत नाही.