कुजबूज--आणखी दोन

By Admin | Updated: May 7, 2014 00:47 IST2014-05-06T20:44:09+5:302014-05-07T00:47:16+5:30

युरीचे काकाप्रेम

Whack - two more | कुजबूज--आणखी दोन

कुजबूज--आणखी दोन

युरीचे काकाप्रेम
चर्चिल आलेमाव हे युरी आलेमाव यांचे काका. ज्योकिमचे पुत्र असलेले युरी यांचे म्हणे काकांवर खूप प्रेम आहे. ज्योकिम व चर्चिलचे अधूनमधून पटत नाही. चर्चिलने काँग्रेस पक्ष सोडला तरी, आपण काँग्रेसला सोडणार नाही, असे ज्योकिमबाब ठामपणे सांगतात. चर्चिल व ज्योकिम एकमेकांशी मध्यंतरी बोलतही नव्हते. युरी आलेमाव यांचे काकांवरील प्रेम लोकसभा निवडणुकीवेळीही उफाळून आले होते. युरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. चर्चिलने काँग्रेसमध्ये बंडखोरी केली व काँग्रेसला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढवली. चर्चिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावे, असे पत्र युरीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार आणि केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना पाठवले होते. या पत्राची अगोदर कुणाला कल्पना आली नाही. आता ते पत्र बाहेर फुटले आहे. युरीने अशा प्रकारचे पत्र पाठवले होते याची चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या दक्षिणेतील नेत्यांमध्ये सुरू आहे. चर्चिलला तिकीट द्यावे, असे पटेल यांनाही म्हणे वाटत होते. खरोखर राष्ट्रवादीने चर्चिलला दक्षिणेत तिकीट दिले असते व काँग्रेसशी आपली युती तोडली असती, तर काँग्रेसची अधिक अडचण झाली असती, हे वेगळे सांगायला नको. मलेशिया भेटीवरच कायम असणारे युरी आता पुन्हा सांगे मतदारसंघात नव्याने सक्रिय होणार आहेत, असे सांगण्यात आले.

माविन काँग्रेसमध्येच
माविन गुदिन्हो हे काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जातील, अशी हवी निर्माण झालेली असली तरी, प्रत्यक्षात गुदिन्हो हे २०१७ सालापर्यंत काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत, असे त्यांच्या नजीकचे काही लोक सांगतात. गुदिन्हो हे मगो पक्षामध्ये तणाव निर्माण व्हावा म्हणून उगाच विधाने करत आहेत, आपण भाजपमध्ये चाललोय अशी हवा तयार करून माविनबाब मगोला आणि काँग्रेसलाही मनस्ताप करत आहेत, असे राजकीय गोटात मानले जात आहे. प्रत्यक्षात वाघ यांनी ज्याप्रमाणे आपण भाजप सोडून काँग्रेसचे लोकसभा तिकीट स्वीकारीन, अशी हवा तयार केली होती. तसेच माविनबाब करत असल्याचे मानले जात आहे. माविनच्या सार्‍या हालचालींवर भाजपचे नेते डॉ. विल्फ्रेड मिस्किता हेही म्हणे नजर ठेवून आहेत. मिस्किता हे काँग्रेसच्या काही आमदारांच्या संपर्कात असतात. काँग्रेसचे जे आमदार माविनच्या विरोधात आहेत, ते मिस्किता यांच्या संपर्कात राहणे पसंत करतात.

Web Title: Whack - two more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.