आई... पाय धुवून येते म्हणून गेली अन् घरी आला चिमुकलीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:37 IST2025-05-06T14:37:15+5:302025-05-06T14:37:45+5:30

पेडामेळ-शिरवई येथे कालव्यात बुडून आठ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत

went to wash her feet and found the body of a child at home | आई... पाय धुवून येते म्हणून गेली अन् घरी आला चिमुकलीचा मृतदेह

आई... पाय धुवून येते म्हणून गेली अन् घरी आला चिमुकलीचा मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : पेडामळ-शिरवई, केपे येथे कालव्यात बुडून आठ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. रविवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. शहद शेख असे त्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे शिरवईवर शोककळा पसरली आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहद आपल्या आई, भाऊ आणि बहिणीसोबत शिरवई येथील एका नातेवाईकाच्या घरी लग्नकार्यासाठी गेली होती. या नातेवाईकाच्या घरापासून जवळच कालवा आहे. दुपारच्या सुमारास शहद हिने आईला मी हातपाय धुण्यासाठी कालव्याकडे जात असल्याचे सांगून ती निघून गेली. घरात लग्न कार्य असल्याने सर्वजण कामात होते. सायंकाळच्या वेळी शहद कुठे दिसत नसल्याचे पाहून आईने शोधाशोध सुरू केली. त्यावेळी तिला शहदने आपण कालव्याकडे जात असल्याचे सांगितल्याचे आठवले.

तिने नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर सर्वांनी कालव्याच्या दिशेने धाव घेत शहदची शोधाशोध सुरू केली असता घरापासून काही अंतरावर कालव्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच केपे पोलिसांनी येऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सा करण्यासाठी मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पाठविला आहे. दरम्यान, लग्नकार्य असलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदयपिळवटून टाकणारा होता.

नवीन कपडे घालायचे होते...

सायंकाळी लग्नघरात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी शहदला नवीन कपडे घालण्यासाठी आई तिला शोधू लागली. बराचवेळ शहद सापडली नाही. त्याचवेळी शहदने हातपाय धुण्यासाठी कालव्याकडे जात असल्याचे सांगितल्याचे आईला आठवले. त्यानंतर सर्वांनी कालव्याकडे जाऊन पाहिले असता शहदचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
 

Web Title: went to wash her feet and found the body of a child at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा