'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत, आता पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 08:02 IST2025-05-08T08:01:52+5:302025-05-08T08:02:54+5:30

वाळपईत भारतीय सैन्याचे अभिनंदन कार्यक्रमात उमटला सूर

welcome operation sindoor now teach permanent lesson to pakistan | 'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत, आता पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा

'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत, आता पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून आपले सामर्थ्य दाखविले आहे. त्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन. आम्हाला जेव्हा भारतीय सैन्य हाक देईल तेव्हा आम्हीदेखील मदतीला धावून जाऊ. आता पाकिस्तानचे तुकडे करून कायमस्वरूपी अद्दल घडवायला पाहिजे असा सूर वाळपईतील शहीद स्तंभाजवळ उमटला.

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने भारतीय सैन्याला पाठिंबा देत अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमात कार्यक्रम निमंत्रक अॅड. शिवाजी देसाई, डॉ. अशोक आमशेकर, पत्रकार उदय सावंत, पत्रकार मिलिंद गाडगीळ, माजी सैनिक सागर सावंत, लाडको कुडतरकर, प्रदीप गवडळकर, समीर बागी, कमलाकांत फडते, रमेश गावस, नारायण गावस, मकरंद वेलींगकर व इतर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजी देसाई म्हणाले की, भारतात पाकिस्तानचे स्लीपर सेल्स असण्याची शक्यता आहे. कोणत्याही पाकिस्तानी अजेंड्याला भारतीयांनी बळी पडता कामा नये. येणाऱ्या काळात निश्चितपणे पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत. आम्हा सर्वांचा आमच्या भारतीय सैन्यावर पूर्णपणे विश्वास आहे.

डॉ. अशोक आमशेकर म्हणाले की, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. भारतात अनेक ठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर असू शकतात. दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड होण्यासाठी भारतीयांनी सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे.

पत्रकार उदय सावंत म्हणाले की आम्ही सर्वांनी सर्व प्रकारची मदत भारतीय सैन्याला करण्यासाठी आता तयार असले पाहिजे. माजी सैनिक सागर सावंत म्हणाले, मी काही काळ काश्मीरमध्ये सैनिक म्हणून सेवा बजावली आहे. आणि आता जर वेळ आली तर पुन्हा भारतीय सीमेवर रक्षणाकरता जायला मागेपुढे पाहणार नाही. यावेळी पत्रकार मिलिंद गाडगीळ आणि इतरांनी विचार मांडले. लाडको कुडतरकर यांनी सूत्रसंचालन केले.
 

Web Title: welcome operation sindoor now teach permanent lesson to pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.