मयेतील घरे कायदेशीर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:53 IST2025-12-16T09:52:48+5:302025-12-16T09:53:49+5:30
मये, कारापूरमध्ये उमेदवारांचा केला प्रचार

मयेतील घरे कायदेशीर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी भाजपच्या डबल इंजिन सरकारने महत्त्वाच्या योजनांना चालना देताना प्रत्येक घरात योजनांचा रतीब पोहोचवलेला आहे. मयेवासीयांना सर्व प्रकारचे हक्क प्रदान करण्यासाठी भाजप सरकारनेच कायद्यात दुरुस्ती करून जनतेला दिलासा दिला आहे.
'माझे घर' योजनेंतर्गत प्रत्येक मयेवासीयांचे घर कायदेशीर करणे हा आपला संकल्प आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता भाजप सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मये मतदारसंघात भाजप उमेदवार कुंदा मांद्रेकर, तसेच कारापूरचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी मये व कारापूर येथे प्रचार सभांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मयेवासीयांचा प्रश्न सोडवण्यासाठी स्व. मनोहर पर्रीकर, स्व. अनंत शेट यांनी मोठे योगदान दिले. आता आमदार प्रेमेंद्र शेट हे जनतेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही. आम्ही जनतेला शंभर टक्के हक्क प्रदान करण्यासाठी सहकार्य करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
समृद्धीचा नारा : प्रेमेंद्र शेट
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, आतापर्यंत मयेवासीयांना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, स्व. अनंत शेट यांनी, तसेच आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूर्ण साथ दिली आहे. प्रत्येक घरात समृद्धीचा नारा यशस्वी करण्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.
जबाबदारी पार पाडूया
उमेदवार कुंदा मांद्रेकर, महेश सावंत म्हणाले, पक्षाने जबाबदारी सोपवली, त्याबद्दल सर्वांनी सहकार्य करावे. दयानंद कारबोटकर, प्रेमानंद म्हाबरे, सुभाष मळीक, संदीप पार्सेकर, शंकर चोडणकर, वासुदेव गावकर, रुपेश ठाणेकर, तसेच मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.