पत्रके वाटून काँग्रेसला उघडे पाडू; भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:52 IST2025-04-18T13:51:32+5:302025-04-18T13:52:38+5:30
नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी गप्प बसणार नाही

पत्रके वाटून काँग्रेसला उघडे पाडू; भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी काँग्रेसला उघडे पाडण्यासाठी भाजप घरोघरी पत्रके वाटणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यानी दिली. २५०० कोटी रुपये मालमत्तेचा हा घोटाळा फार मोठ्या स्वरुपाचा असून लोकांपर्यंत काँग्रेसचे काळे कारनामे पोहोचायला हवेत. त्यामुळे घरोघरी पत्रके वाटून आम्ही काँग्रेसला उघडे पाडू, असेही त्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेस माजी आमदार तथा पक्षाचे उत्तर गोवा सहप्रभारी सिद्धार्थ कुंकळ्ळकर व पक्षाचे सचिव सर्वानंद भगत उपस्थित होते. यावेळी नाईक म्हणाले की, काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत टू जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा यासारखे अनेक घोटाळे केले. आता नॅशनल हेराल्ड घोटाळ्याच्या प्रकरणात हा पक्ष गाजत आहे.
नॅशनल हेराल्डची दिल्ली, मुंबई, पाटणा, पुणे येथे कार्यालये आहेत. हे वृत्तपत्र तोट्यात चालत होते. सुमारे २० कोटी रुपयांचे कर्ज या वृत्तपत्राच्या डोक्यावर आहे. काँग्रेसने या वृत्तपत्राच्या २५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून घोटाळा केलेला आहे. ५० लाख रुपये गुंतवणूक करून कर्ज आपल्या डोक्यावर घेतले व २५०० कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्याचा डाव आखला.
काँग्रेस सुटणार नाही
नाईक म्हणाले की, या प्रकरणातून आपल्याला बाहेर काढावे ही काँग्रेसची मागणी हायकोर्टाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना केवळ कोर्टात प्रत्यक्ष उपस्थिती न लावण्याबाबत शिथिलता दिली. या प्रकरणातून काँग्रेस सुटणार नाही.