संयमामुळेच ध्येयापर्यंत पोहोचलो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:29 IST2026-02-26T13:29:02+5:302026-02-26T13:29:30+5:30
'स्टुडंट्स पार्लमेंट स्पर्धा २०२६' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संयमामुळेच ध्येयापर्यंत पोहोचलो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माझ्याकडे खूप संयम आहे. त्यामुळे सभापतीही माझे कौतुक करतात. आपण संयम राखला तर आयुष्यात मोठी ध्येये साध्य करू शकतो. अन्यथा जीवनात खूप काही गमावूही शकतो हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.
आयोजित 'स्टुडंट्स पार्लमेंट स्पर्धा सरकार व गोवा विधीकार मंचतर्फे २०२६' कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. सभापती डॉ. गणेश गावकर, उपसभापती जोशुआ डिसोझा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना जीवनात संयम पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले, निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करा, राजकारणातच नव्हे तर सामाजिक, आर्थिक क्षेत्रातही नेतृत्व करा. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेते आहेत. केवळ राजकारणात आले म्हणून नेता बनता येते असे नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातही नेतृत्व करता येते.
निर्णय घेण्यासाठी अंगी क्षमता काम असावी लागते, तरच माणूस नेता होऊ शकतो. व्यापार, उद्योग-धंद्यात नेतृत्व करा. लहान-सहान नोकऱ्या करून कोणाच्या हाताखाली करण्याऐवजी नेतृत्व गुण संपादन करून स्वतःचा व्यवसाय सुरु करा. योग्य नियोजन, परिश्रम या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांनी संयम पाळून आपली प्रगती करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतील चर्चेच्या दर्जाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अलीकडच्या काळात विधानसभेतील संवाद भरकटत चालला आहे. चर्चेचा स्तर खालावला असून ही बाब राजकीय विश्लेषकांनीही नोंदवली आहे. जुन्या काळच्या संसदीय चर्चेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ सदस्यांना आजही त्या काळातील शिस्तबद्ध आणि दर्जेदार चर्चा आठवतात. सभागृहातील सदस्यांनी आपली मते मांडताना योग्य भाषेचा वापर करावा. संसदीय नियमांचे पालन करावे. योग्य आचारसंहितेचे भान ठेवावे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला...
मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांची संसद ही केवळ स्पर्धा नसून भविष्यातील लोकप्रतिनिधी घडविण्याचे व्यासपीठ आहे. सभागृहातील चर्चा, नियम, शिस्त आणि विरोधकांचा आदर राखायला हवा. लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, विधानसभा आणि संसदेमधील कामकाज कसे चालते, याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना या स्पर्धेमुळे मिळते. त्याचबरोबर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्वकला संशोधनाची सवय, टीमवर्क यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक व लोकशाहीविषयक उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.