आम्हाला युती नकोच; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुद्रावतार, काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्षांना घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:15 IST2025-11-27T13:15:34+5:302025-11-27T13:15:57+5:30
कार्यकर्त्यांनी आवाज वाढवल्याने काही वेळ वातावरण तापले. माणिकराव ठाकरे यांना भेटून भावना कळवतो, असे सांगून प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयातून काढता पाय घेतला.

आम्हाला युती नकोच; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुद्रावतार, काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्षांना घेरले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विरोधकांची युती दृष्टिपथात असल्याचे चित्र निर्माण होऊन २४ तासही उलटले नसताना कग्रेसच्या काही गटाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी काल, बुधवारी काँग्रेस भवनमध्ये गोंधळ घालत युतीला विरोध केला. 'आम्हाला युती नकोच', अशी भूमिका घेत त्यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना घेरले.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरजी किंवा गोवा फॉरवर्डकडे युती केल्यास काँग्रेसच्या जिवावर हे पक्ष मजबूत होतील व २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फटका बसेल. दुसरीकडे आरजीची परप्रांतीयांविरोधातील भूमिका काँग्रेसला मारक ठरेल व ही मतेही काँग्रेसच्या हातून जातील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युती करू नये, अशी ठाम मागणी काँग्रेस भवनवर धडक देत पक्षाच्या शंभरेक कार्यकर्त्यांनी केली. काही गटाध्यक्षांनीही जोरदारपणे विरोध केला. पाटकर यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनीही आवाज वाढवल्याने काही वेळ वातावरण तापले.
खासदार विरियातो फर्नांडिसही तेथे आले व कार्यकर्त्यांची समजूत घालू लागले. परंतु संतप्त कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सांताक्रुझ, शिवोलीसारखे काँग्रेसचे हक्काचे मतदारसंघ इतर पक्षांना कसे काय देता? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. युतीच्या प्रश्नावर आक्रमक बनलेले कार्यकर्ते शांत व्हायला तयार नाहीत हे बघून पाटकर यांनी पक्षप्रभारी माणिकराव ठाकरे, पक्षाच्या सहप्रभारी अंजली निंबाळकर यांना भेटून तुमच्या भावना कळवतो, असे सांगून तेथून काढता पाय घेतला. ठाकरे व निंबाळकर सध्या गोव्यात आहेत. सुमारे दीड ते दोन तासानंतर पाटकर काँग्रेस भवनात परतले. रात्री उशिरापर्यंत काही कार्यकर्ते काँग्रेस भवनात होते.
दरम्यान, काँग्रेसने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १८ उमेदवारांची पहिली यादी निश्चित केल्याची चर्चा काल दिवसभर होती. 'लोकमत'ने यासंबंधी पाटकर यांना विचारले असता ते म्हणाले की 'मित्रपक्षांकडे सध्या बोलणी चालू आहेत. जागावांटपासाठी आणखी काही बैठका होतील. अजून कोणतीही यादी जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत १८ उमेदवार जाहीर करणार आहात का? या प्रश्नावरही स्पष्ट काही सांगितले नाही.
नेते फिरकले नाहीत
दरम्यान, रौद्रावतार धारण केलेल्या कार्यकर्त्यांना पाटकर यांनी 'भी तुमच्या सोबतच आहे. परंतु युतीच्या बाबतीत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने जर काही निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य करावा लागेल' असे कार्यकर्त्यांना सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काँग्रेस भवनमध्ये येऊन आपल्याला भेटावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. परंतु माणिकराव ठाकरे, निंबाळकर किंवा युरी आलेमावही शेवटपर्यंत काँग्रेस भवनात आले नाहीत. शेवटी कार्यकर्ते घरी परतले.
मतभेद नाहीत : कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले : पाटकर
या गोंधळाबद्दल पाटकर यांना विचारले असता ते म्हणाले की, 'पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. काही कार्यकर्ते आपले विचार मांडण्यासाठी आले होते. त्यांनी आपल्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या. आमचा पक्ष लोकशाही मानणारा आहे. कार्यकर्त्यांना त्यांची मतें मांडण्याचा अधिकार आहे. युतीबाबत विचारले असता पाटकर म्हणाले की, 'गोव्याच्या हितासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे मला वाटते.'