सोमवारी पाणी पुरवठा पूर्ववत होईल : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 16:55 IST2019-08-17T16:55:19+5:302019-08-17T16:55:38+5:30
खांडेपार येथे जलवाहिन्या फुटल्यामुळे गेले काही दिवस पणजीसह तिसवाडीतील सर्वच भाग पाण्याच्या समस्येने होरपळत आहेत.

सोमवारी पाणी पुरवठा पूर्ववत होईल : मुख्यमंत्री
पणजी : येत्या सोमवारी तिसवाडी व अन्य भागांत नळांद्वारे पाणी पुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
खांडेपार येथे जलवाहिन्या फुटल्यामुळे गेले काही दिवस पणजीसह तिसवाडीतील सर्वच भाग पाण्याच्या समस्येने होरपळत आहेत. टँकरनी दर प्रचंड वाढवला आहे. बांधकाम खात्याकडील टँकर कमी पडत आहेत. फोंडा तालुक्यातीलही अनेक भागांना पिण्याचे पाणी मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर पणजीत अग्नीशामक दलाच्या एका कार्यक्रमानंतर शनिवारी दुपारी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम ब:यापैकी सुरू आहे. लोकांनी चिंता करू नये, नळाद्वारे पाण्याची व्यवस्था सोमवारी सायंकाळपासून होईल.
मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारचे स्थितीवर लक्ष आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य प्रधान अभियंत्यांशीही आपण बोललो आहोत व लोकांना जिथे टँकरची व्यवस्था हवी, तिथे टँकर पुरविण्याची सूचना केली आहे. टँकरची व्यवस्था सगळीकडे केली जात आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी सकाळी पूर्ण होईल आणि मग सोमवारी सायंकाळीच नळांद्वारे पाणी येऊ लागेल.
दरम्यान, पणजीत सध्या विक्रेत्यांकडील पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठाही संपुष्टात येऊ लागला आहे. मोठय़ा बाटल्या तर उपलब्धच नाहीत. मोठय़ा संख्येने छोटय़ा बाटल्याही लोक खरेदी करत आहेत. कारण पाणीच उपलब्ध नाही. राजधानी पणजीमधील अनेक कुटूंबांनी शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने आपले फ्लॅट बंद करून गोव्याबाहेर जाणो पसंत केले आहे. हॉटेलांमध्ये पाणी आहे. त्यामुळे काही लोक हॉटेलच्या खोल्यांचाही वापर करू लागले आहेत. मात्र त्यासाठी लोकांचा बराच पैसाही खर्च होत आहे. सोमवारी सायंकाळी तरी पाणी पोहचेल ना असा प्रश्न लोक विचारत आहेत.