जागतिक जल दिन, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, त्यातच पाणीटंचाईच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. जागतिक जलदिनानिमित्त पाणी संवर्धनाचे संदेश दिले जात असताना बोरी व शिरोडा परिसरातील वास्तव मात्र चिंताजनक आहे. या भागात रात्री उशिरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिक आजही पाण्यासाठी रात्री जागून काढत आहेत.
बोरी व शिरोडा येथील पाणीवाडा-तसेच तरवडे, पाझ-शिरोडा शिरशिरे-आफ्रामेत या भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक घरांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी तीन-चार दिवसांनी एकदा, तेही कमी दाबाने आणि रात्री उशिरा पाणी सोडले जाते. यासंदर्भात स्थानिक प्रदीप गावडे यांनी सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ठोस प्रतिसाद मिळत नाही. काही दिवसांपूर्वी मोर्चा काढल्यानंतर तात्पुरता पाणीपुरवठा सुरळीत झाला; मात्र पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. रात्री उशिरा पाणी येत असल्याने नागरिकांना झोप न घेता पाण्याची वाट पाहावी लागते.
२४ तास नको, निदान दोन तास तरी पाणी द्या
दरम्यान, बोरीतील स्थानिक महिला विमल गावडे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. पाण्याशिवाय घरगुती कामे कशी करायची? असा प्रश्न त्यांनी केला. घरात लहान मुले व ज्येष्ठ नागरिक असल्याने पाण्याची गरज अधिक भासते. टँकरचे पाणीही अनेकदा दूषित असते. दररोज पूर्णवेळ पाणी नको, पण सकाळी व रात्री प्रत्येकी दोन तास नियमित पाणीपुरवठा झाला तरी मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विहिरींकडे पुन्हा वळण्याची गरज
बोरी-शिरोडा परिसरात अनेक विहिरी असतानाही त्यांचा वापर कमी झाला आहे. पंचायत स्तरावर विहिरींच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध असून, काही नागरिक त्याचा वापर करून विहिरींची स्वच्छता करून पाणी इतर गरजांसाठी वापरत आहेत. एकेकाळी ग्रामीण भागात विहिरी हेच मुख्य पाण्याचे स्रोत होते. दरवर्षी त्यांची स्वच्छता केली जात होती. मात्र, नळजोडणी आल्यानंतर विहिरी दुर्लक्षित झाल्या आहेत.
सांडपाण्यामुळे विहिरी दूषित
पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, घरांमधील सांडपाणी व मलनि:स्सारणाचे पाणी योग्य प्रक्रियेशिवाय जमिनीत सोडले जाते. त्यामुळे ते विहिरींमध्ये मिसळून पाणी दूषित होत आहे तसेच तळी व झऱ्यांमध्ये प्लास्टिक कचरा टाकला जात असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असून, इतर कामांसाठीच वापरणे योग्य ठरते.
Web Summary : Severe water scarcity plagues Bori and Shiroda. Residents struggle with late-night, infrequent water supply. Despite complaints, authorities haven't resolved the issue, forcing people to stay awake for water. Locals urge for at least two hours of daily supply and emphasize well cleaning.
Web Summary : बोरी और शिरोडा में पानी की भारी कमी है। निवासियों को देर रात, अनियमित जलापूर्ति से जूझना पड़ता है। शिकायतों के बावजूद, अधिकारियों ने समस्या का समाधान नहीं किया है, जिससे लोग पानी के लिए जागने को मजबूर हैं। स्थानीय लोग प्रतिदिन कम से कम दो घंटे की आपूर्ति का आग्रह करते हैं और कुओं की सफाई पर जोर देते हैं।