आमठाणे धरणाच्या पाणी पातळीत झाली ५० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 08:08 IST2025-02-25T08:07:42+5:302025-02-25T08:08:10+5:30
पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

आमठाणे धरणाच्या पाणी पातळीत झाली ५० टक्के घट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आमठाणे धरणातील पाण्याची पातळी ५० टक्के घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मान्सूनला अजून चार महिने बाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणाऱ्या आमठाणे जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्के घटली आहे. बार्देश तालुक्याची भिस्त अस्नोडा प्रकल्पावर असते. तिळारीचे पाणी बंद झाल्यावर आमठाणे धरणच आधार असते. तेथे आज ही स्थिती आहे.
अलीकडचे तिळारीच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानंतर १४ दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागला. या काळात आमठाणे धरणातून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी घेण्यात आले. अंजुणे धरण सध्या ६६ टक्के भरलेले आहे. सत्तरी तालुका या धरणावर अवलंबून आहे.
साळावली धरणाच्या जलाशयात ७८ टक्के पाणी भरलेले आहे. काणकोणला पाणी पुरवणारे चापोली धरण ७४ टक्के भरले आहे. गवाणे धरणातही ७५ टक्के जलसाठा आहे. तर शिरोडा व परिसराला पाणी पुरवणाऱ्या पंचवाडी धरणात ६१ टक्के पाणी आहे.
चिंतेचे कारण नाही : सुभाष शिरोडकर
जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याच्या पातळीचे आम्ही दैनंदिन तत्त्वावर मॉनिटरिंग करतो. सध्याची पातळी नॉर्मल आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांना बऱ्यापैकी पाणी मिळाले. त्यामुळे पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध आहे. येत्या मे मध्ये अडवपाल, साळ येथील बंधारा पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शापोरा नदीचे पाणी येथे साठवून ठेवले जाणार आहे. हे पाणी मिळू शकेल. त्यानंतर उत्तर गोव्यातील पाण्याची समस्या दूर होईल.'