मंत्र्यांच्या कामगिरीवर वॉच; दामू नाईक यांना अमित शाह यांनी दिल्या पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 09:36 IST2025-02-15T09:35:38+5:302025-02-15T09:36:43+5:30
मंत्र्यांचे प्रगती पुस्तक एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मिळून तयार करणार आहेत.

मंत्र्यांच्या कामगिरीवर वॉच; दामू नाईक यांना अमित शाह यांनी दिल्या पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत घेतलेल्या भेटीवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मंत्र्यांच्या कामावर पक्षाची आता करडी नजर राहणार आहे. मंत्र्यांचे प्रगती पुस्तक एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मिळून तयार करणार आहेत.
२०२७च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने आतापासूनच तयारी चालवली आहे. शाह यांनी दामूंकडून गोव्यातील राजकीय स्थितीविषयी माहिती घेतली. मंत्र्यांनी चांगली कामगीरी दाखवायला हवी. त्या अनुषंगाने पक्षानेही मंत्र्यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यायला हवा, अशी सूचना शहा यांनी केली अशी माहिती पक्ष सुत्रांकडून प्राप्त झाली. दामू नाईक यांनी मात्र मिडियाला कोणतीच माहिती दिली नाही.
काल, शुक्रवारी दामू गोव्यात परतले. 'लोकमत'ने संपर्क साधून त्यांना मंत्रिमंडळ फेररचना किंवा अन्य विषयांवर शाह यांच्याकडे चर्चा झाली का? असे विचारले दामूंनी या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. मंत्रिमंडळ फेरचनेचा विषय गेली दोन वर्षे चालू आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपप्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी केवळ आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिलेले आहे. विधानसभेचा अर्ध्याहून अधिक कार्यकाळ उलटला. मंत्रिपद कधी मिळणार? या प्रतीक्षेत फुटीर आहेत. मंत्रिमंडळात योग्यवेळी बदल होतील. मंत्र्यांच्या कामगिरीचे 'रिपोर्ट कार्ड' मात्र पक्ष नेतृत्त्व न चुकता घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नड्डांनाही भेटले
प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर दामू यांनी शहा यांची घेतलेली ही पहिलीच भेट होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही ते भेटले. परंतु नड्डांकडे त्यांची धावती भेट झाली. शाह यांनी दामूंकडून गोव्यातील पक्षाच्या तसेच सरकारच्या कामगिरीबद्दल जाणून घेतले. येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका होणार असल्याची तसेच २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची कशी तयारी चालली आहे, याची कल्पना दामू यांनी त्यांना दिली. अलीकडेच राबवलेल्या पक्ष सदस्यता मोहीमेत सव्वा चार लाख सदस्य भाजपने केल्याची कल्पना श्रेष्ठींना देण्यात आली.