राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:36 IST2025-05-16T07:35:22+5:302025-05-16T07:36:21+5:30
काही भागांत बरसला मुसळधार

राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्याच्या काही भागांत बुधवारी रात्री आणि गुरुवारी दिवसभरात काही काळ गडगडाटासह पाऊस कोसळला. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. तर हवामान खात्याने, पुढील चार दिवस, १८ मेपर्यंत राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात गेले पंधरा दिवस उन्हाचा पारा वाढला आहे. तापमान ३५ ते ३६ अंशांपर्यंत गेले आहे. उन्हाचे चटके सहन होत नाहीत, अशी स्थिती आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण आहे. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास पणजीसह राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. गुरुवारीही काही भागांत मुसळधार कोसळला.
दरम्यान, गुरुवारी दुपारी डिचोली, सत्तरी, फोंडा तालुक्यांसह उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागांत पाऊस झाला. या पावसाने फटका विक्रेते, नागरिकांची तारांबळ उडाली.
मच्छीमारांसाठी इशारा
पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वादळी वारे, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. यंदा राज्यात मान्सून लवकर येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.