विश्वजीत राणे समर्थकांनी दंड थोपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:29 IST2026-03-03T13:28:52+5:302026-03-03T13:29:14+5:30

गेल्या आठवड्यात दोनापावलाच्या मोर्चावेळी मंत्र्यांना सुरक्षा देण्यात पोलिस कमी पडल्याची सभेत टीका

vishwajit rane supporters gather | विश्वजीत राणे समर्थकांनी दंड थोपटले

विश्वजीत राणे समर्थकांनी दंड थोपटले

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव: टीसीपी कायदा कलम ३९ ए विरोधात गेल्या आठवड्यात राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावल येथील घरावर मोर्चा नेल्यानंतर काल उसगाव येथे विश्वजीत राणे यांचे समर्थक जमले. त्यांनी मंत्री राणे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत राणे यांना सुरक्षा देण्यात पोलिस कमी पडले, अशी तोफ डागली. समर्थकांनी केलेले हे शक्ती प्रदर्शन व पोलिसांकडे दाखवलेले बोट राज्यात चर्चेचा विषय ठरू लागले आहे.

'मंत्री विश्वजित राणे यांनी आरोग्य खात्यात विविध सुधारणा घडवून आणल्या आहेत. विविध लोकोपयोगी कामामुळे त्यांचे समाजात महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. हे कोणाला तरी खुपत असल्यामुळे त्यांना समाजात मिळालेले स्थान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या प्रत्येक लोकोपयोगी विकासकामांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे,' असे वाळपई भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच उसगावचे पंच रामनाथ डांगी यांनी सांगितले. तिस्क उसगाव येथे मंत्री राणे यांच्या कार्यालयासमोर सोमवारी सकाळी झालेल्या समर्थक व हितचिंतकांच्या शक्तिप्रदर्शनावेळी ते बोलत होते.

डांगी म्हणाले की, '३९-अ' हे कलम एकट्या मंत्री विश्वजित राणे यांनी केलेले नाही. सामान्य लोकांच्या हितासाठी त्यांनी या कलमाला फक्त मान्यता दिली. त्यांनी जमिनी विकलेल्या नाहीत. जमीन क्षेत्रात बदल केलेला नाही. तरीही मोर्चा काढला गेला. कोणाच्याही खासगी निवासस्थानात जाऊन आक्रमण करणे हे संविधानात बसत नाही. राणे यांच्या बंगल्याकडे जाऊन त्यांची तिरडी बांधणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.'

उसगावचे सरपंच संजय ऊर्फ प्रकाश गावडे म्हणाले की, 'आम्ही माणूस आहोत, गुरे नाहीत. जे कोणी मंत्री विश्वजित राणे विरोधात कारवाया करतील, त्यांना परिणाम भोगावे लागतील.'

माजी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू म्हणाले की, 'राणे यांच्यामुळे उसगाव व सत्तरीत वाहणारी सरकारी रोजगाराची गंगा त्यांना पाहवत नाही. राणे गरीब लोकांचे रक्षण करतात. राणे यांना तेथे धोका असेल त्या ठिकाणी यापुढे आम्ही प्रथम पोहोचू, सदोदित मंत्री राणे यांच्यासोबत राहू.'

गुरुदास गावडे म्हणाले की, 'मंत्री विश्वजित राणे यांना चांगले आयुष्य, आरोग्य लाभू दे. अशी परमेश्वराशी प्रार्थना आहे.'
उसगाव पंचायतीच्या उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच सदस्य रेश्मा मटकर, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारेन्हास, विल्यम मास्कारेन्हास, गोविंद परब फात्रेकर, नरेंद्र गावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, माजी पंच सदस्य दिनेश तारी यांसह समर्थक, हितचिंतक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मोठा पोलिस बंदोबस्त

मंत्री राणे सोमवारी सकाळी उसगावच्या लोकांना भेटण्यासाठी कार्यालयात येणार होते. परंतु काही कारणास्तव त्यांचा हा दौरा रद्द झाला. या शक्तिप्रदर्शनावेळी पोलिस फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

पोलिसांचे अपयश

डांगी म्हणाले की, 'मंत्री विश्वजित राणे यांना संरक्षण देण्यात पोलिस दल अपयशी ठरले आहे. त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे. राणे यांच्या पाठीशी आम्ही नेहमी खंबीरपणे उभे राहू. राणे यांनी आरोग्य केंद्रांत अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत. गरीब, दुर्बल घटकातील लोकांना त्यांनी विविध प्रकारे सहकार्य केले आहे. रुग्णांना वैद्यकीय उपचारास आर्थिक सहाय्य केले आहे.'

ते एकटेच जबाबदार नाहीत : नाईक

उसगाव जिल्हा पंचायत सदस्य समीक्षा नाईक म्हणाल्या की, 'यापूर्वी जंगलात आग लावण्याचे प्रकार घडत होते. त्यावेळी मंत्री राणे चुड घेऊन फिरत होते का? ते सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात, म्हणून त्यांचे पाय ओढण्याचे प्रयत्न होत आहेत. जे काही झाले, त्याला मंत्री विश्वजित राणे एकटे जबाबदार नाहीत. यापुढे मंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात कुठलीच घटना आम्ही खपवून घेणार नाही. त्या ठिकाणी आम्ही प्रथम उपस्थित राहू.'

हे तर षड्‍यंत्र : लक्ष्मीकांत नाईक

लक्ष्मीकांत नाईक म्हणाले की, 'पोलिस असताना आंदोलक मंत्री विश्वजित राणे यांच्या खासगी बंगल्याकडे पोहोचले, यामागे काहीतरी षड्‍यंत्र आहे. त्याचा आम्ही प्रखर विरोध करतो.'

Web Title : विरोध के बाद विश्वजीत राणे के समर्थक एकजुट, पुलिस पर विफलता का आरोप

Web Summary : मंत्री विश्वजीत राणे के समर्थक उसगांव में एकत्र हुए और हाल के विरोधों के खिलाफ उनका बचाव किया। उन्होंने पुलिस पर अपर्याप्त सुरक्षा का आरोप लगाया और टीसीपी कानून में बदलाव से संबंधित आरोपों के बीच अटूट समर्थन का वादा किया, यह दावा करते हुए कि राणे का विकास कार्य समुदाय को लाभान्वित करता है।

Web Title : Vishwajit Rane Supporters Rally After Protest, Accuse Police Failure

Web Summary : Supporters of Minister Vishwajit Rane gathered in Usgaon, defending him against recent protests. They criticized police for inadequate security and vowed unwavering support amid allegations related to TCP law changes, asserting Rane's development work benefits the community.