७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:54 IST2025-05-16T07:51:15+5:302025-05-16T07:54:50+5:30
देश योग्य प्रकारे पुढे नेत आहेत. पंचाहत्तर वर्षे काहीच नव्हे, १०० वर्षे झाली तरी, नरेंद्र मोदींकडेच देशाचे नेतृत्व राहायला हवे, यासाठी गेले काही दिवस प्रार्थना केल्याचे सांगितले.

७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’?
लोकमत न्यूज नेटवर्क, साखळी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कार्यक्षम आहे. त्यांना पंचाहत्तर वर्षे झाल्यानंतर देखील त्यांच्याकडेच नेतृत्व राहायला हवे. भविष्यात त्यांना शंभर वर्षे झाली तरी, देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी यांच्याकडेच राहावे, अशी इच्छा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली.
कुळण साखळी येथे मोठा धार्मिक सोहळा काल पार पडला. त्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार जीत आरोलकर आदी अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांचेही या सोहळ्यावेळी भाषण झाले. त्यांनीही पंतप्रधान मोदी यांचे हात आता अधिक बळकट झाले आहेत, असे उद्गार काढले.
मंत्री विश्वजीत राणे यांनी आपण धार्मिक सोहळ्यावेळी पंतप्रधानांसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. देशाला जगात मोदींनी मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देश ते योग्य प्रकारे पुढे नेत आहेत. पंचाहत्तर वर्षे काहीच नव्हे, १०० वर्षे झाली तरी, मोदींकडेच देशाचे नेतृत्व राहायला हवे यासाठी गेले काही दिवस प्रार्थना केल्याचे मंत्री राणे म्हणाले.
या सोहळ्यापूर्वी काही मंत्री, आमदारांनी शिवलिंगावर फुले वाहिली, पूजा, आरती केली. कार्यक्रम सायंकाळी झाला, पण सकाळीही या सोहळ्याच्या ठिकाणी मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत आदींनी भेट दिली. मंत्री ढवळीकर यांनीही अभिषेक केला. गेले अनेक दिवस मंत्री विश्वजित यांनी पुढाकार घेऊन साखळीत शंकर आराधनेचा सोहळा चालविला. त्यात मोठ्या संख्येने राजकीय नेते, उद्योजक व भाविक सहभागी झाले.