३३ हजार कुटुंबांना विश्वजीत राणेंचे गिफ्ट; तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:25 IST2025-08-21T07:23:56+5:302025-08-21T07:25:00+5:30
नगरगाव येथे कार्यक्रम : सत्तरी व उसगावच्या लोकांना दिलासा

३३ हजार कुटुंबांना विश्वजीत राणेंचे गिफ्ट; तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : सत्तरी तालुका आणि उसगावचा भाग अशा ठिकाणी मिळून एकूण ३३ हजार कुटुंबांना मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी यावेळी चतुर्थीचे गिफ्ट दिले. मोठ्या प्रमाणात कडधान्य, तेल व अन्य साहित्य लोकांमध्ये वितरित करण्याचे काम सुरू आहे. काल, बुधवारी नगरगाव आणि मोर्ले अशा दोन ठिकाणी मोठे सोहळे झाले.
आरोग्यमंत्री तथा वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्वजीत राणे यांनी नगरगाव येथे उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. गणेश चतुर्थी सणावेळी लोक आनंदित असावे, कायम लोकांची चूल पेटावी यासाठी आपण मदतीचा हात दिला आहे. यापुढील काळात भाजप सरकार लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न सोडविल. सावंत सरकार उपाययोजना करत आहे, असे मंत्री राणे म्हणाले.
यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, 'सत्तरी तालुक्यात विविध प्रकारचे प्रकल्प उभे केले जातील. सत्तरीच्या जनतेच्या विकासासाठीच माझे राजकारण आहे. त्यासाठीच मी पाऊले उचलत आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्ताने लोकांना मदतीचा हात देताना मला आनंद होत आहे. सत्तरी तालुक्यातील व उसगावच्या जनतेसाठी मी कायम अशा प्रकारे काम करत राहीन.
मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक
'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जे विविध कायदे आणले आहेत, त्यातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन येईल. सामान्य लोकांची घरे कायदेशीर होतील' असे मंत्री राणे म्हणाले. दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी बातमी मी वाचली. मला आनंद झाला. कामत हे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी कायम विकासाला साथ दिली. आता विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हेही राज्यात जोरात विकासकामे करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
चतुर्थी भेट कार्यक्रम
दरम्यान, उसगाव, नगरगाव, ठाणे, सावर्डे, म्हाऊस, वाळपई, खोतोडे, केरी, मोर्ले, पर्ये, पिसुर्ले आदी सर्व ठिकाणच्या जनतेसाठी चतुर्थी भेट कार्यक्रम सुरू आहेत. पर्ये मतदारसंघातील पंचायत क्षेत्रांमध्ये आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होत आहेत.