युती तोडण्यास सरदेसाई, पाटकर हेच जबाबदार; मनोज परब यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:55 IST2025-12-11T14:54:49+5:302025-12-11T14:55:52+5:30
विश्वासघात करून त्यांनी उभे केले उमेदवार

युती तोडण्यास सरदेसाई, पाटकर हेच जबाबदार; मनोज परब यांचा हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विरोधकांची युती तुटण्यास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे पूर्णपणे जबाबदार आहेत. आम्ही युतीसाठी अनेक तालुके त्यांच्यासाठी सोडले, तरी आम्हाला न विचारता त्यांनी तेथे उमेदवार उभे केले. भाजपला मागील दाराने जिंकून देण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी बुधवारी पणजीत पत्रकार परिषदेत केला. यावेळी आरजीचे आमदार विरेश बोरकर व अजय खोलकर उपस्थित होते.
मनोज परब म्हणाले, आम्हाला ही युती हवी होती. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली. अनेक बैठकांत सहभागी झालो. पण, सरदेसाई आणि पाटकर यांना आरजी नको होती. आमचा बहुजनांचा पक्ष पुढे गेला, तर त्यांना ते नको होते. त्यामुळे त्यांनी युती होऊ दिली नाही. आम्ही सासष्टी, सत्तरी, डिचोली अशा अनेक तालुक्यांत आमचे मतदार असताना त्या जागा मागितल्या नाहीत. सर्व मतदारसंघात मतदार असताना आम्ही फक्त १३ जागांवरच दावा केला होता. पण, आम्हाला विश्वासात न घेता खोर्ली, शिरोडा, सांताक्रुझ यांसारख्या जागेवर गोवा फॉरवर्ड, कॉग्रेसने उमेदवार जाहीर केले.
लोकांच्या भावनांशी खेळ...
मनोज परब म्हणाले, विजय सरदेसाई हे २०२२मधील मायकल लोबोंप्रमाणेच आहेत. लोकांच्या भावनांवर निवडून यायचे आणि नंतर भाजपत जाण्यासाठी वातावरण तयार करायचे, अशीच त्यांची पद्धत आहे. सरदेसाई पुन्हा एकदा लोकांमध्ये भाजपविरोधी भावना निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, निवडून आल्यानंतर राजकीय स्वार्थासाठी भाजपत जाण्याची त्यांची तयारी आहे.
मनोजला चांगले बोलण्याची देवाने बुद्धी द्यावी : गोवा फॉरवर्ड
रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांना देवाने चांगले बोलण्याची बुद्धी द्यावी. विजय सरदेसाई, अमित पाटकर तसेच माणिकराव ठाकरे यांच्यावर केलेले खासगी आरोप हे खूपच निंदनीय आहेत, असे गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी पत्रकार परिषेदत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विकास भगत व पूजा नाईक उपस्थित होते. दीपक कळंगुटकर म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही. पुढे विधानसभा निवडणुका आहेत. मतांचे विभाजन होऊ देऊ नका. भाजपविरोधात आपण एकत्र उभे राहून लढायला हवे. आम्ही आरजीविरोधात नाही तर भाजपविरोधात आहोत. पण, मनोजने केलेले आरोप हे खूप चुकीचे आहेत. सरदेसाई यांनी सातत्याने बहुजन समाजासाठी काम केले आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे.