राज्यात 'वंदे मातरम्'ने भरला देशभक्तीचा रंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:52 IST2025-11-08T08:50:52+5:302025-11-08T08:52:38+5:30
कला अकादमीत आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : विकसित भारत मोहिमेला गोमंतकीयांनी बळ देण्याचे आवाहन.

राज्यात 'वंदे मातरम्'ने भरला देशभक्तीचा रंग
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित शुक्रवारी राज्यात कठिकाणी वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे अवघे वातावरण देशभक्तीमध्ये रंगून गेले.
वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित केंद्र सरकारने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व शाळा, सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी ९:५० वाजता हे गीत गायनचा कार्यक्रम झाला. पणजी येथील कला अकादमीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह शाळकरी विद्यार्थी तसेच मान्यवरांनीही हे गीत म्हटले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'वंदे मातरम् या गीताने अनेक स्वातंत्र सैनिकांना ब्रिटिशांविरोधातील लढ्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. हे केवळ गीत नसून देशभक्ती निर्माण करणारे स्फूर्ती गीत आहे. हे गीत म्हणजे देशाच्या हृदयाचे ठोके असून गीत ऐकून स्फूर्ती मिळते.
भारत हा सर्वधर्मसमभाव जपणारा देश आहे. हे राष्ट्रगीत युवकांसाठी प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७चे स्वप्न पाहिले आहे. युवकांना विज्ञान, संशोधन अशा विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत. विकसित देश म्हणजेच विकसित युवा पिढी असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
गोव्यात प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या शिक्षण संस्था कार्यरत असून उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमाची संधी युवकांना मिळत आहे. गोवा हे लहान राज्य असले तरी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील २५ वर्षे ही युवकांची असून त्यांचा विकास हा देशाचा विकास असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.