वंदे मातरम् : एक प्रेरणामंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:53 IST2025-11-07T07:53:05+5:302025-11-07T07:53:32+5:30

वंदे मातरम' हे अमर काव्य ऋषी बंकिमचंद्रांना ७नोव्हेंबर १८७५ रोजी कार्तिक शुद्ध नवमी दिवशी स्फुरले होते, २०२५ हे या तेजस्वी गीताचे १५० वे स्फुरण स्मरण वर्ष आहे. त्यानिमित्त...

vande mataram an Inspirational mantra | वंदे मातरम् : एक प्रेरणामंत्र

वंदे मातरम् : एक प्रेरणामंत्र

हिमालयम् समारभ्यं यावद इंदू सरोवर। तं देव निर्मितं देश हिंदुस्थानं प्रचक्षते ॥ हीच भावना वंदे मातरम गीतात आहे. कार्तिक शुद्ध नवमी, शके १७९७ म्हणजेच ७नोव्हेंबर १८७५ या दिवशी ऋषी बंकिमचंद्राच्या लेखणीतून हे गीत अवतीर्ण झाले. 'माते तुला वंदन असो' इतका सोपा अर्थ आहे 'वंदे मातरम्'चा.

'वंदे मातरम' शब्दात आमची संस्कृती आहे. या शब्दांनी मोठा इतिहास घडविला आहे. या शब्दात आमच्या प्रेरणा आहेत. या शब्दांमुळे आम्हाला मरणाचीही भीती वाटत नाही, इतके सामर्थ्य या दोन शब्दांत आहे.

एका राष्ट्राचा स्वातंत्र्यलढा ज्या शब्दांभोवती बांधला गेला, त्या शब्दांशिवाय आमच्या स्वातंत्र्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. महात्मा गांधी म्हणतात "हे राष्ट्र जोपर्यंत आहे तोपर्यंत हे गीत राहणारच."

आमच्या भारतीय संस्कृतीचे स्रोत असलेले मातृपूजन, जननी, जन्मभूमी आणि जगनमाता यांच्या पूजनाचे प्रतीक असलेले शब्द म्हणजे वंदे मातरम.

१९०५ च्या वंगभंग चळवळीत हा मंत्र रणघोष बनला. स्वातंत्र्याचे प्रतीक बनला. वंदे मातरम शब्दांची इंग्रजांनी धास्ती घेतली. बालकांपासून वृद्धांपर्यंत, स्त्रियांपासून, सशस्त्र सत्याग्रहीपर्यंत

सशस्त्र लढा उभारणाऱ्या क्रांतिकारकांपर्यंत सर्वांनाच हा मंत्र परकीय सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी उद्युक्त करणारा ठरावा हेच या मंत्राचे विशेष आहे. बंकिमचंद्रांनी दुर्गेला, कालीमातेला भारत मातेच्या रूपात पाहिले. या स्वतःच्या जन्मभूमीला मातृपूजेची जोड दिली.

वेदांमध्ये पृथ्वीचे स्तवन आहे. अनेक ऋचांमध्ये घर, सुखसंपत्तीची इच्छा, रोगमुक्ती, दीर्घायुषी करण्याची प्रार्थना आहे. या सर्वात असे कुठेही प्रतित होत नाही की हे सर्व फक्त भारत देशातील लोकांसाठीच उपलब्ध आहे, इथे तर संपूर्ण पृथ्वीवरील मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना आहे. भारतीय दृष्टीने वंदे मातरम चा अर्थ पृथ्वीमाता किंवा भूमातेला वंदन असा आहे. हा जयघोष कुणाच्याही विरुद्ध नाही.

वंदे मातरम हे शब्द प्राचीन भारतीयांनी सांगितलेल्या विश्वात्मक संस्कृतीचे दर्शनच आहे. ज्या भूमीवर, ज्या धरतीवर आम्ही जन्मालो, ती मातेसमानच आहे. वंदे मातरम हे केवळ एक गीत नव्हे तर ती एक कलाकृती आहे, ती एक सहज अंत प्रेरणा आहे. 'वंदे मातरम' हे अमर काव्य ऋषी बंकिमचंद्रांना ७ नोव्हेंबर १८७५ रोजी कार्तिक शुद्ध नवमी दिवशी स्फुरले होते, २०२५ हे या तेजस्वी गीताचे १५० वे स्फुरण स्मरण वर्ष आहे. 

ऋषी बंकिमचंद्रांकडून वंदे मातरम या हिऱ्याला 'आनंदमठ'चे अत्यंत सुंदर कोंदण लांबले आहे. या गीताने स्वातंत्र्य लढ्यातील लाखो लोकांना, नेत्यांना प्रेरणा दिली. इसवी सन १९०५ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या कालखंडातील हिंदुस्थानच्या इतिहासातील बहुतेक सर्व घटना, आंदोलने, चळवळी, शस्त्र सिद्ध उठाव हे वंदे मातरम शब्दाशी जोडले गेले आहेत. बंगालची फाळणी हा इतिहासाचा महत्त्वाचा टप्पा. वंदे मातरमचा घोष संपूर्ण हिंदुस्थानभर पोहोचवण्यास बंगालची फाळणीच कारणीभूत झाली.

१९ व्या शतकाच्या अखेरीस कलकत्ता हीच इंग्रजांची राजधानी होती. १८९९ मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांची नेमणूक झाली. आणि जुलूम अत्याचाराचा कळस गाठला गेला, वंदे मातरम् शब्दांमधली आग इंग्रजी सत्तेला भस्मसात करणारी होती. बंगालच्या फाळणीची घोषणा झाली आणि त्याचा निषेध करायला जमलेल्या भारतीयांच्या मुखातून शब्द उमटले, वंदे मातरमा आज आपण हा मंत्र विसरलो आहोत, म्हणून भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा मुद्दाम घेण्याची आवश्यकता वाटते. ही भरतभूमी माझी मातृभूमी आहे, तिच्यासाठी मी सर्व काही करीन अशी तयारी असणारे हजारो तरुण मी तयार करीन, अशी भावना वंदे मातरमच्या उच्चारणातूनच प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल. त्यासाठी इतिहासाचे अवलोकन करण्याची आवश्यकता आहे. 

'वंदे मातरम' म्हणत सर्वस्व अर्पिणाऱ्या देशभक्तांच्या चरित्रातून अशी प्रेरणा सहज मिळते. आजच्या काळात क्रांतीची गरज असेलच असे नाही, तर आपल्या देशाला त्याच्या गौरवाच्या स्थितीत परत नेऊन ठेवण्यासाठी खूप मोठ्या त्यागाची आणि कार्याची गरज आहे. देवभूमी असलेल्या मातृभूमीकडे गेली अनेक वर्षे आम्ही अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. सनातन अशा भारतमातेच्या प्रतिष्ठेसाठी गौरवासाठी आणि तिच्या सर्व शत्रूचा नाश करण्यासाठी तिला शरण गेले पाहिजे.

आज संपूर्ण देश वंदे मातरम या महामंत्राची दीडशे वर्षे साजरी करत असताना एकच निर्धार करूया, भारतमातेच्या चरणी समर्पण केलेल्या आपल्या पूर्वजांची आठवण ठेवून या मातृभूमीला तिच्या अत्युच्च स्थानावर नेण्यासाठी समर्पित होऊया।

- वल्लभ केळकर, म्हापसा

Web Title : वंदे मातरम: एक प्रेरणा मंत्र - इतिहास और महत्व

Web Summary : वंदे मातरम भारतीय संस्कृति का प्रतीक है, जिसने स्वतंत्रता संग्राम को प्रेरित किया। 1905 के आंदोलन से लेकर आज तक, यह मातृभूमि के प्रति समर्पण का प्रतीक है। 150 वर्ष पूरे होने पर, यह भारत माता की महिमा के लिए समर्पण का आग्रह करता है, देशभक्तों के बलिदानों और राष्ट्रीय एकता और प्रगति की आवश्यकता को दर्शाता है।

Web Title : Vande Mataram: An Inspirational Mantra - History and Significance

Web Summary : Vande Mataram embodies Indian culture, inspiring freedom struggles. From the 1905 movement to today, it symbolizes devotion to the motherland. Celebrating 150 years, it urges dedication to Bharat Mata's glory, echoing the sacrifices of patriots and the need for national unity and progress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.