उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:48 IST2025-03-20T07:48:27+5:302025-03-20T07:48:27+5:30

मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते."

utpal parrikar will conquer panaji one day | उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

नीना नाईक, पणजी

भाईंचा म्हणजे मनोहर पर्रीकर यांचा स्मृतिदिन पणजीत पार पडला. भाईच्या विचारातच मिरामारला पोचले. अनेक आठवणी मनात रेंगाळत होत्या. मी आणि दुर्गा भाईंच्या पुतळ्यासमोर उभ्या राहिलो. रात्रीची वेळ. भाईंची धीरगंभीर मूर्ती निरभ्र आकाशाखाली उभी आहे. समुद्राची गाज ऐकत, सळसळणारा वारा अंगावर घेत, रस्त्यावरची वाहतूक निरखत, असंख्य फुलांचे हार गळ्यात सांभाळत, डावीकडे बघणारी नजर, एक पाऊल पुढे टाकून कुठेतरी जायची घाई असल्यागत जणू भाईच समोर ताठमानेन उभे होते. आजूबाजूला नजर फिरवली.

चाफा दरवळून परिसर प्रसन्न करत होता. प्राजक्ताच्या आणि बकुळीच्या फुलांचा सडा समोर पडला होता. दोन्ही बाजूला दोन लाल फुलांची झाडं दरबान कशी अदबीने उभी होती. निसर्गाची इंद्र सभाच जणू, पुतळ्यापाशी नतमस्तक होताना त्यांच्या पायाशी 'नारळ' दिसला. आम्ही भाईच्या आठवणी जागवत तिथेच बसलो. 'भाईन आपैला' असा निरोप आला की कामात झोकून द्या. भाई सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेत. भाईंना विरोधकांची कमतरता नव्हती. पण भाई त्यांना पुरून उरले. भाईंनी आग पाहिली, सापही पाहिले. पण त्यांची प्रतिकारशक्ती प्रचंड. आम्ही दोघी भाईंचे गुणगान गात होतो, पण भाईना स्तुती आवडत नसे. डोळ्यांचं पात लवतं न लवतं.. पुतळा हलतोय असा भास झाला. वायूगतीने एक तेजस्वी मूर्ती समोर उभी राहिली.

'सुटला गो!'.. अरे, हा तर भाईंचा आवाज. भाई बोलू लागले.. 'माझा पुतळा करून इथे पणजीचा राखणदार म्हणून उभं केलंय मला. पणजीची अवस्था मला पाहावत नाही. खड्डे, खोदकाम, धडधडणारे आवाज मला अस्वस्थ करतात. मला हाताची घडी घालून हे निमूटपणे पाहावं लागतं. झोडून काढायला हवं एकेकाला...' पुढे म्हणू लागले.. 'तुला ठाऊक आहे, काही आमदार मी जिवंत असताना माझ्या मरणाची याचिका घेऊन वरपर्यंत जाऊन कुरबूर करून आले. गरळ ओकून आले.' मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते."

'अग्गो..' म्हणत भाईनी चष्मा परत डोळ्यावर लावला. 'उत्पल माझा मुलगा आहे. मी त्याला आयत्या बिळावर बसवणार नाही. तो माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे जाणार. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी राजकारणात आलो नाही. त्यानेही चढं उतार शिकले पाहिजेत. मी दिलेली अनुभवाची शिदोरी उत्पलकडे आहे. तुम्ही निःशंक राहा. उत्पल पणजीवर दुरून प्रेम करत नाही, श्वास घेणं जशी माणसाची गरज आहे, तशी पणजीशी एकरूप होणारी दुसरी योग्य व्यक्ती नाही. त्याची बुद्धी, संयम तो सार्थकी लावेल. आत्मिक सामर्थ्याने तो एकदिवस पणजी जिंकेल. उत्पल राजकारणी नाही, तो सामाजिक कार्य करू शकतो. तो मर्यादा, जीवनमूल्य पायाखाली तुडवणारा नाही. उत्पलने त्याचा स्वाभिमान विकलेला नाही. आता तो दिवस लवकर उगवेल.' क्षणभरात भाई दिसेनासे झाले. देव भेटल्याचा आनंद आमच्या मनात मावत नव्हता. आता पुतळ्यासमोर नारळ ठेवण्याचा अर्थ कळला. समाधीकडे पाहिलं.. पुतळा सोन्यासारखा चकाकत होता. काळ्याकुट्ट अंधारात त्यांचं तेज लखाखत होतं.

 

Web Title: utpal parrikar will conquer panaji one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.